नवी मुंबई, सोलापूर : मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकला. आज नवी मुंबईत कोकण भवनावर मुकमोर्चा काढण्यात आला. तर सोलापूरच्या मोर्चालाही उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी आंदोलकांनी मानले झी 24 तासचे आभार मानलेत.
राज्यभर सुरु असलेल्या मराठा मोर्चाचं लोण आता मुंबईच्या वेशीवर आले आहे. मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतून मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. खारघर सेंट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवनपर्यंत मराठा क्रांती मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. रायगड आणि नवी मुंबई अशा दोन विभागाचा हा मोर्चा असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.. यात मुंबई कृषी उत्पन्न समितीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी झाले.
मराठा समाजाच्या मोर्चांची मालिका सुरूच आहे. आज एकाच दिवशी दोन ठिकाणी विराट मोर्चे काढण्यात आले. नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये मराठा समाजानं मोर्चे काढले. या मोर्चाला मराठा समाजाच्या महिला, तरूण, तरुणींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. तर सोलापूरमध्ये निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चात आंदोलकांनी झी 24 तासचे आभार मानले. मराठा समाजाच्या भावना राज्यभर पोहचवल्यामुळं मराठा समाजाच्या बांधवांनी झी 24 तासचे बॅनर लावून आभार मानले.
हिंगोली, जालना, लातूरनंतर सोलापुरात मराठा मूक मोर्चाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोर्चात खेडोपाड्यातील नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. या महिला आणि तरुणाईची संख्या लक्षवेधी आहे. मोर्चामुळे सोलापूरच्या सर्व बाजूंचे हायवे आणि रस्ते जाम झालेत. सोलापूरच्या संभाजी चौकातून निघालेला मोर्चा, शहरच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा खूप शिस्तप्रिय होता. मराठा आरक्षण,कोपर्डी हत्याकांडात न्याय, आणि अॅट्रोसिटी कायद्यातबदल करावा या मागण्या मोर्चात करण्यात आल्या.