रत्नागिरी : शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.
शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यामुळे बिबट्या आणि कुत्रा दोघेही घाबरले आणि दोघांनीही शौचालयात गपचुप बसून राहणंच पसंत केलं. सकाळी घराचे मालक मनोहर सुर्वे यांनी शौचालयाच दार उघडलं आणि काय समोर होते त्यावेळी बिबट्या आणि कुत्रा. त्यांना बघून सुर्वेंची परिस्थिती पडता भुईथोडी झाली आणि त्यांनी त्वरित शौचालयाचा दरवाजा बंद केला.
गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना त्यांनी खबर दिली तसे पोलीस पाटलांनी वन विभागाला बोलावलं. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शौचालयाचा वरचा भाग फळ्यानी बंद केला आणि खालच्या भागाला पिंजरा लावला.
शौचालयाचा दरवाजा उघडताच अडकलेला बिबट्या पिंज-यात येऊन जेरबंद झाला. पाठलाग केलेला कुत्रा सुखरूप बाहेर आहे तर बिबट्या मात्र वन विभागाने लावलेल्या पिंज-यात जेरबंद. सध्या तरी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती दिलीये.