नाशिक : नाशिकमध्ये सोमवारी एका विवाहितेनं सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हुंडा आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे हुंड्याचे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल उपस्थित होतोय.
मागच्या वर्षी जानेवारीत आरती पाटील हिचा विवाह नाशिकमध्ये राहणाऱ्या गौरव सावकार या तरूणाशी झाला. सावकार कुटुंबियांचा नाशिकमध्ये स्वतःचा प्रकल्प आहे. मात्र लग्न झाल्यावर एका वर्षाच्या आत आरतीने या जगाचा निरोप घेतला.
सासरच्या व्यक्तींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास गिला जात होता. पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी तगादा लावला जात होता. असा तिच्या पालकांचा दावा आहे. त्याचबरोबर मुलीने आत्महत्या केली नसून तिचा सासरच्यांनी खून केल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सासू सासरे आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आरतीचं माहेर कोल्हापुरात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी केली जातेय. तपासात दिरंगाई कऱणाऱ्या पोलीस अधिका-यांऐवजी सक्षम अधिका-यांकडे तपास सोपवण्याची मागणी केली जातेय.
एकीकडे महिला आणि मुलींना सन्मान देण्यासाठी सरकारी पातळीवर रोज नवनव्या घोषणा होतात. पण समाजात मात्र असं महिलांचं शोषण होत असेल त्यांचे जीव जात असतील तर खरोखर विचार करण्यासारखी स्थिती आहे. या प्रकरणात मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा अशी कुटुंबियांची अपेक्षा आहे. मात्र असे प्रकारच घडू नयेत यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.