कोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.

Updated: Oct 8, 2014, 03:17 PM IST
कोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.

अपघातात मालगाडीचे अकरा डबे रूळावरून घसरल्याने रूळ उखडून गेले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला असून अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झालेत. दुसऱ्या दिवशीही रुळाचे काम न झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंदच आहेत. अनेक गाड्या रखडल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. २४ तास होत आले तरी या मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे.

मालगाडीचे अकरा डबे रूळापासून ५० ते ६० फूट लांब शेतात फेकले गेले. तसेच रूळही पूर्णत: उखडून गेला. सुदैवाने मात्र यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. रूळ उघडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अपघातनंतर या घटनेची माहिती मिळताच मदत बचाव कार्य घेऊन रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काल दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. अद्याप काम पूर्ण न झाल्याने वाहतूक बंदच आहे.
 
नेत्रावती, वेरावळ, हापा एक्स्प्रेसचा मार्ग बदलला. मुंबईकडे जाणारी १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस, १६३३४ वेरावळ एक्स्प्रेस, १९५७७ हापा एक्स्प्रेस तर मंगलोरच्या दिशेने जाणारी १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस, १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस, २२११३ कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तर मांडवी, जनशताब्दी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रद्द करण्यात आली. अपघातामुळे कोकणात जाणारी १०१०३ मांडवी एक्स्प्रेस, १२०५१ दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी तर मुंबईच्या दिशेने येणारी १०१०४ मांडवी एक्स्प्रेस, १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेस, ५०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधी आपल्या गाडीची सद्यस्थिती १३९ क्रमांकावर दूरध्वनी करून तपासून घ्यावी, असेही सांगण्यात आले. काही गाडय़ा चिपळूण आणि रत्नागिरीपर्यंतच चालवण्यात आल्या. या गाडय़ांमधील प्रवाशांना पुढील स्थानकापर्यंत एसटीने नेऊन त्यापुढे रेल्वेने इच्छित स्थळी पोहोचवण्याचा कार्यक्रमही कोकण रेल्वेने हाती घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.