नाशिक : नाशिकमधून सुरु झालेला शेकडो कोटी रुपयांचा केबीसी घोटाळ्याचा तपास गेल्या काही दिवसापासून पूर्णतः थंडावला आहे.
कंपनीच्या कारभाराचा लेखाजोखा असणारी हार्डडीस्क आणि महत्वाचे कागदपत्र गेल्या दोन वर्षापासून फोर्नेसिक लँबमध्ये पडून आहेत. त्यामुळे तपास करावा तरी कसा आणि कुठल्या माहितीच्या आधारावर असा प्रश्न आर्थिक गुन्हे शाखेला पडला आहे.
गेल्या दोन चार वर्षांपासून नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यात केबीसी घोटाळा चांगलाच गाजतोय. हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणारा मोस्ट वाँटे़ड भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाणला गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी पकडण्यात आलं. मात्र राज्यभरातल्या फसलेल्या गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास होणार की काय अशी शंका उपस्थित केली जातेय.
ठेवादारांच्या भ्रमनिरासाला पोलीस विभागातील संथ कारभार आणि दोन खात्यातील विसंवाद जबाबदार आहे. 2014 मध्ये जेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला. सीआयडीने केबीसीच्या कार्यालयावर छापे मारून कागदपत्रांसह हार्डडिस्कही जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली होती. या घटनेला आता दोन वर्ष होत आहेत.
तरीही फॉरेन्सिकचा अहवालही पोलिसांना मिळालेला नाही. तसंच जमा केलेली हार्डडीस्क आणि कागदपत्रही मिळालेली नाहीत. या हार्डडीस्कमध्ये केबीसी घोटाळ्याच्या व्याप्तीची इत्थंभूत माहिती होती. भाऊसाहेब चव्हाणवर 9 गुन्हे दाखल आहेत. त्या प्रत्येक गुन्ह्यात त्याच्या जबाबातून जेवढी माहिती मिळेल त्यावरूनच पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी तपास पूर्णपणे थंडावलाय.
सीआयडी आणि फॉरेन्सिक लॅब या दोन्ही विभागांशी या संदर्भात चर्चा झाली असून येत्या आठ दिवसांत गुन्ह्याशी निगडीत असलेले महत्त्वाचे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागतील. त्यानंतर तपासाला गती मिळेल असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जातोय. मात्र प्रत्यक्षात किती दिवसांनी गुन्ह्याचा तपासाला सुरवात होणार आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील या बाबत साशंकता आहे.