जळगाव: जळगावात महावितरणचं उघड्यावर पडलेलं कोट्यवधी रुपयांचं विजेचं साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलंय. एमआयडीसी परिसरातल्या महावितरण कंपनीच्या जागेवर उघडण्यावर पडलेल्या या साहित्याला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली.
आज सकाळी साडेअकरा वाजता आग लागल्यावरही सुमारे तासभर एकही बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी आलेला नव्हता. तीन ते चार तास या आगीचं तांडव सुरूच होतं. उशिरानं आलेल्या बंबांनी ही आग विझवली तोपर्यंत विजेचं साहित्य जाळून खाक झालं होतं. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी महावितरण कंपनीकडे कुठलंही साहित्य दिसून आलं नाही.
या आगीत विजेचे रोहित्रे, तांब्याच्या तसंच अल्युमिनिअमच्या तारा, वायर्स जाळून खाक झाले. वीज वितरण कंपनी तसंच क्रॉम्पटन कंपनीचं हे साहित्य होतं. शेतातील पिकं विजेअभावी करपत असल्यानं एकीकडे शेतकरी आम्हाला वीज द्या, कनेक्शन द्या असा टाहो महावितरण कंपनीकडे फोडत असताना त्यांना साहित्य उपलब्ध नाही असा कांगावा करत वीज मिळत नाही, तर दुसरीकडे याच अधिकाऱ्यांची बेफिकिरी अशा घटनांमागे दिसते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.