बौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर

महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 11, 2017, 04:58 PM IST
बौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर  title=

अलिबाग : उत्सव आणि सोहळे साजरा करणं आपल्यासाठी नवीन नाहीत. आपण महापुरूषांची जयंती साजरी करतो. हे आपण पाहिलं असेल आणि ऐकलंही असेल. मात्र आता महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 337 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क ढोलताशांच्या गजर करत रायगडावर मोठा जल्लोष केला. साहसी प्रात्याक्षिकांचंही आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपतींच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वाजवण्यात येणार नसल्याचं गेल्याच आठवड्यात सांस्कृतिक मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांच्या या आश्वासनाला हरताळ फासण्यात आलंय. 

ढोलताशे वाजवून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ महाराज गेल्याचं दुःख व्यक्त करत होते की आनंद हा प्रश्न समस्त जनतेला पडलाय. विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अभिनेते राहुल सोलापूरकर, विविध जिल्हा परीषदांचे अध्यक्ष, महापालिकांचे नगराध्यक्ष यावेळी उपस्थित होते.