पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रंगला. मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली. 

Updated: Sep 15, 2016, 09:23 PM IST
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन title=

पुणे : रिमझिम पावसात न्हाऊन निघालेली पुण्यनगरी, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर... अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रंगला. मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली. 

मानाचा पहिला कसबा गणपती

पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती. चांदीच्या पालखीतून या बाप्पाची मिरवणूक निघाली. सनई चौघड्याला तुतारीची साथ, ढोलताशांच्या तालावर रंगलेला टिपरीचा खेळ, कलावंत तसंच कामायनीचं ढोलपथक या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य. प्रभात बँडनेही लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले परदेशी गणेशभक्त हे या मिरवणुकीचं यावर्षीचं वैशिष्ट्य

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती

तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघाली होती. नादब्रह्म, ताल तसंच शिवमुद्रा ढोलताशा पथकांनी या मिरवणुकीत धमाल आणली. ध्वजपथकाने सादर केलेली प्रात्यक्षिकंही आकर्षक होती. न्यू गंधर्व बँड पथक श्रवणीय होतं. या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठा होता. इतिहास संशोधक मंडळाने सादर केलेल्या जिवंत देखाव्याने शिवरायांचा इतिहास जागवला

मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती

मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणुक फुलांच्या राजेशाही रथातून निघाली. या मिरवणुकीत नादब्रह्म, चेतक तसंच शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या सादरीकरणावर गणेशभक्तांनी ठेका धरला.  ध्वजपथकाचा पदन्यासही चित्तवेधक होता. नेहमीप्रमाणे गुलालाची उधळण करत या गणपतीला निरोप देण्यात आला. 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती 

या गणपतीची मूर्ती भव्य आणि देखणी आहे. फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. स्वरुपवर्धिनी तसंच गजलक्ष्मी ढोलताशा पथकाचं वादन रंगतदार ठरलं. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचं लेझीम आणि झांज पथकही लक्षवेधी होतं. ऑलंपिक 2020 च्या तयारीचा अनोखा रथ या मिरवणुकीत पाहायला मिळाला. विविध विषयांवरील समाजिक प्रबोधनपर रथदेखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

या मिरवणुकीत सनई चौघड्यांच्या जोडीला श्रीराम , शौर्य तसंच शिवमुद्रा ढोलताशा पथकं सहभागी झाली होती. चैतन्य गोखले यांचं ध्वजपथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरलें. त्याशिवाय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दीनिमित्त सादर करण्यात आलेला देखावा लक्षवेधी होता. 

सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली मानाच्या गणपतींची मिरवणुक संध्याकाळपर्यत चालली. गणेशभक्तीचे नानाविध रंग या मिरवणुकीत पाहायला मिळाले. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदांमध्ये झाले. पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक देत पुण्याच्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन सोहळा पार पडला.