राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले. 

Updated: Apr 18, 2015, 11:02 PM IST
राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार title=

पुणे : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले. 

राणेंनी निवडणुकी आधी मला दूरध्वनी केला होता तेव्हा, मी त्यांना ही निवडणूक लढवू नका, म्हटले होते. वांद्रेचा मतदारसंघही तुमच्यासाठी पूर्णपणे नवा आहे. तेव्हा तुमच्यासारख्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदी राहिलेल्या नेत्याने ही निवडणूक लढवणे योग्य नाही, असे आपण राणेंना सांगितल्याचे अजित पवार म्हणालेत.

मुंबई  बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी असताना या मतदारसंघात काम केलेय. तसेच येथे कोकणी मतदारही आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय अंतिम असल्याचे राणे त्यावेळी म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

राणेंचा निर्णय पक्का असल्याने शेवटी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, असे अजित पवारांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. नुकत्याच झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून १८ हजार ८ मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.