शिकलेल्या बापाची ही कहाणी

आपण दुय्यम दर्जाचं काम करतो म्हणून आपल्या गुणवान आणि उच्चशिक्षीत मुलीला लग्नासाठी नाकारलं जात आहे, हे पाहून हळवा पिता कासावीस झाला.

Updated: Feb 25, 2016, 08:16 AM IST
शिकलेल्या बापाची ही कहाणी title=

नांदेड : आपण दुय्यम दर्जाचं काम करतो म्हणून आपल्या गुणवान आणि उच्चशिक्षीत मुलीला लग्नासाठी नाकारलं जात आहे, हे पाहून हळवा पिता कासावीस झाला. आणि जिद्द तसंच मेहेनतीच्या जोरावर त्यानं पहिल्याच प्रयत्नात वकिलीची पदवीही मिळवली. शिकलेल्या बापाची ही कहाणी. 

नांदेड शहरातले केशव हनमंते छोटंसं पंक्चरच दुकान चालवतात. आपल्या मुलीची सोयरीक मोडल्याच्या वेदनेतून त्यांनी या वयात वकील होण्याची किमया करुन दाखवली. 

केशव हनमंते यांची मोठी मुलगी धनश्री द्विपदवीधर आहे. पण तिला पाहायला आलेल्या प्रत्येक मुलानं तिला नकार दिला, कारण तिचे वडील सायकल रिपेअरिंग आणि पंक्चर काढण्याचं काम करतात. हीच गोष्ट केशव हनमंते यांना सलत होती. म्हणून आपल्यावरचा हा डाग पुसण्याची जिद्द मनी बाळगूनच, पदवीधर असलेल्या केशव यांनी २०१३ मध्ये एल. एल. बी ला प्रवेश घेतला. आणि ते पहिल्याच प्रयत्नात वकीलही झाले. 

दिवसभर पंक्चरच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री २-३ वाजेपर्यंत, केशव हनमंते, एल एल बी चा अभ्यास करायचे. वडील पंक्चर काढण्याचं काम करतात म्हणून ऊच्चविद्याविभूषीत धनश्रीला आधी नाकारणाऱ्या मुलांचीच स्थळ आता तिला सांगून येऊ लागली. 

धनश्रीची आता सोयरीकही झालीय. मात्र आपल्यासाठी दिवसरात्र एक करुन वकील झालेल्या वडिलांबाबत, धनश्रीच्या मनात अपार अभिमानाची भावना आहे. 

समाजात आजही संस्कारांपेक्षाही घराणं, प्रतिष्ठा पाहून सोयरीक जमवली जाते. त्या सर्वांच्या डोळ्यात कर्तृत्ववान केशव हनमंते यांनी झणझणीत अंजन घातलंय. कारण कोणतंही काम छोटं मोठं नसतं.