ठाणे : तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या नव्या 'समाजमाध्यमां'मुळे अवघं जग हे ग्लोबल व्हिलेज बनलंय. पण याच सोशल मीडियामुळं नात्यांमधला दुरावाही वाढला आहे. प्रेमाची नाती जुळण्यासाठी मदतकारक ठरणारं हे माध्यम... पण आता सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे पती-पत्नीमध्ये घटस्फोटही होऊ लागलेत... ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासमोर घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं गेल्या वर्षभरात पुढं आली. त्यामध्ये लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासू-सासरे छळ करतात, अशा स्वरूपाची प्रकरणं होतीच. मात्र जवळपास निम्म्या तक्रारी 'सोशल मीडिया'शी संबंधित होत्या.
सोशल मीडिया' हे संवादाचं यशस्वी माध्यम आहे. मात्र, त्याच्या अतिवापरामुळे कुटुंबात विसंवाद वाढतोय. दिवसभर नोकरीधंदा सांभाळून घरी परतल्यानंतरही 'सोशल मीडिया'वर वेळ घालवण्यात अनेक जण धन्यता मानतात. परिणामी पती-पत्नीमध्ये पुरेसा संवादच होत नाही. त्यातून मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. सोशल मीडियामुळं नवरा-बायकोत एकमेकांबद्दलचा संशय वाढतो. घरातली भांडणं किंवा घरातल्या खासगी गोष्टींवर सोशल मीडियावर चर्चा होते. त्यामुळं जोडपी एकमेकांपासून दूर गेल्याची उदाहरणं पुढं आलीत.
त्यामुळं फेसबुकवर एखाद्या पोस्टवर लाइक मिळवण्याआधी आपल्या घरच्यांशी दररोज संवाद साधा. व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या बायकोशी निवांत गप्पा मारा. विकेन्डला घरच्यांना फिरायला न्या. इतरांना जी ठेच लागलीय, त्यातून तुम्ही तरी शहाणे व्हा, हा सल्ला तरुणांना देण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.