मुंबई : राज्यातील टोलमुक्तीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून आता 65 टोलनाक्यावरील टोलमुक्तीसाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
1 जूनपासून राज्यातील 12 टोलनाके कायमचे बंद होणार असून 53 टोलनाक्यांवर लहान खाजगी वाहने, एस.टी आणि स्कूल बसला टोलमाफी मिळणार आहे. त्यामुळे 1 जूनपासून राज्यातील जनतेला टोलमधून मोठा दिलासा मिळणार आहे.
53 टोलनाक्यांवर जड व्यावसायिक वाहनांना मात्र टोल कायम असणार आहे. मागील महिन्यात विधानसभा अधिवेशनात सरकारने ही टोलमाफीची घोषणा केली होती.
महत्त्वाचं म्हणजे, टोलमुक्तीसाठी तीन दिवस शिल्लक असताना टोलमुक्तीची अधिसूचना मात्र अद्याप निघालेली नाही. लहान वाहनांना मिळणाऱ्या टोलमाफीच्या रकमेची भरपाई कंत्राटदाराला कशा पद्धतीने करून द्यायची, याबाबतचा निर्णयही अद्याप झालेला नाही.
कोल्हापूर टोलनाक्याबाबत 31 मेपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र कोल्हापूर टोलनाक्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही.
दुसरीकडे मुंबई एन्ट्री पॉईंट टोलबाबत निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीचाही अहवाल अद्याप आलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.