पुणे : सीसीटीव्ही बाबतचा कुठलाच विषय आरोप प्रत्यारोपांशिवाय पुढे सरकत नाही. गणेशोत्सव काळात पुण्यातील विसर्जन घाटांवर महापालिकेतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याच्या टेंडर प्रक्रियेत गोलमाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. महापालिकेनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय.
पुणे महापालिकेला पुणेकरांच्या सुरक्षेची काळजी आहे. त्यासाठीच विसर्जन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा घाट घालण्यात आलाय. गणेशोत्सव काळात विसर्जन घाटावरील संशयास्पद हालचाली कैद करण्यासाठी ८० विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची उपाय योजना असल्याने हे कॅमेरे विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्यात येणार आहेत, आणि त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
ज्या कॅमेऱ्याची किंमत ६ ते ७ हजार रुपये आहे, ते कॅमेरे दुपटी पेक्षा जास्त दराने भाड्याने घेण्यात येत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. त्याशिवाय या कॅमेऱ्यांचा दर्जादेखील सुमार असल्याचं सजग नागरिक मंचाच म्हणणं आहे.
सजग नागरिक मंचाच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केलाय. ४ कॅमेऱ्यांचे मिळून एक युनिट तसेच मनुष्यबळाचा त्यात समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलय.
सीसीटीव्ही केमेऱ्याच्या टेंडर प्रक्रियेत घोळ आहे किंवा नाही हे लवकरच समोर येईल. यातील महत्वाचा विषय हा कॅमेऱ्याच्या दर्जाचा आहे. अशावेळी आयपी बेस्ड कॅमेरे बसवण्याचे निर्देश असताना महापालिकेतर्फे एनालॉग पद्धतीचे केमेरे भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेले हे कॅमेरे केवळ बुजगावणी ठरू नयेत एवढीच अपेक्षा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.