कोल्हापूर : प्रदेश भाजपच्या अधिवेशनात शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडण्यात आलेली नाही. आम्ही स्वतंत्र लढल्यानेच भाजपला ताकद कळाली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, हरलेल्या जागा भाजप नेत्यांनी दत्तक घ्याव्यात आणि प्रत्येक गावात भाजपचा बुथ दिसला पाहिजे, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सल्ला दिलाय.
भाजपच्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच शिवसेनेवरीही कुरघोडी केली. सरकार आल्यानं जबाबदारी संपत नाही. उलट वाढते. जी जागा हरली आहे. ती जागा नेत्यांनी दत्तक घ्यावी, असं अमित शाह म्हणालेत. तर स्वतंत्र लढल्यानं आम्हाला आमची ताकद समजली असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकांच्यावेळी आम्हाला शिवसेनेबरोबरची युती तोडावी लागेल याची थोडीशीही कल्पना नव्हती. पण परिस्थितीने आम्हाला युती तोडण्यासाठी भाग पाडले. मात्र, त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की, भाजपला राज्यातील स्वत:ची ताकद उमगली. अन्यथा आम्हाला कधीच स्वत:ची ताकद कळाली नसती, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
विधानसभेच्यावेळी फार कमी दिवसांत आमच्यापुढे २८८ जागा लढविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, त्यावेळी अमित शाह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. निवडणुकीतील त्यांच्या चोख व्यवस्थापनामुळे आणि खंबीर भूमिकेमुळेच राज्यातील भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळाले. त्याच बळावर आम्ही राज्यामध्ये सत्ता आणण्यात यशस्वी ठरल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.