मुंबई: थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे. उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं राज्यातील प्रमुख १६ शहरांचं किमान तापमान १० अंशांखाली आलं आहे.
सोमवारी नागपूरमध्ये राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान होते. ४६ वर्षांनंतर प्रथमच नागपूरमध्ये तापमान ५ अंशांवर आलं. डिसेंबर १९६८ साली नागपूरमध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. यंदा नागपूरकरांना हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे.
का घसरतोय पारा?
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आता श्रीलंका - तमिळनाडूच्या लगत आहे. विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची तीव्र लाट आहे.
परिणाम?
मराठवाड्याच्या काही भागांत थंडीची लाट राहणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
१० अंशांखालील...
नागपूर - ५,
नांदेड - ६,
नाशिक - ६.१,
अकोला - ७,
जळगाव - ७.२,
वर्धा - ७.४,
पुणे - ७.८,
यवतमाळ - ७.८,
मालेगाव - ८,
बीड - ८,
औरंगाबाद - ८.१,
परभणी - ८.७,
उस्मानाबाद - ९,
बुलढाणा - ९.४,
अहमदनगर - ९.८,
सातारा - ९.९
१० अंशांवरील...
चंद्रपूर - ११, महाबळेश्वर - ११.८, सोलापूर १२.५,
कोल्हापूर - १५, मुंबई- १५.२
राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत तापमान थंड राहणार आहे, नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून तापमान वाढ होण्याची सुरुवात होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. राज्यासह बाजूच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांतही थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. साधारणत: राज्यातील तापमान सरासरीपेक्षा ४ ते ७ अंश सेल्सिअसनं घसरलं आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीलगत सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमान घसरलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.