पुणे : पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली. नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला, मात्र विरोधाभास असा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढा-यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठीचं प्रवेश शुल्क भरलं नाही. त्यामुळे निवडून येण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली करणारे हे नेते शिवरायांसारखा कारभार कसा बरे करणार अशी शंका उपस्थित होत आहे.
महापालिकेत निवडून आल्यानंतर छत्रपती शिवरायांसारखा स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, गतीमान कारभार करण्याची प्रतिज्ञा भाजपच्या उमेदवारांनी घेतली.
सिंहगडाच्या पायथ्याला एक चेक पोस्ट आहे. घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीच्या माध्यामातून इथलं कामकाज चालतं. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ संयुक्तरित्या सिंहगड परिसराची देखभाल करतात. त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी गडावर जाणार्या वाहनांकडून प्रवेश शुल्क घेतलं जातं. चारचाकी वाहनासाठी प्रत्येकी फक्त ५० रुपये आकारले जातात. असं असताना सकाळी शपथवीधीसाठी गडावर गेलेल्या एकाही वाहनासाठी प्रवेश शुल्क दिलं गेलं नाही.