'मुझे मेरी बिवी से बचाओ...' म्हणणाऱ्यांसाठी खास आश्रम

तुमची बायको तुमचा छळ करते? तुमची बायको तुमचा नको जीव करते? काय करावं, हे तुम्हाला कळत नाहीय? अशाच पत्नीपिडीत पुरूषांसाठी एक आश्रम सुरू करण्यात आलाय. 

Updated: Dec 21, 2016, 11:39 PM IST
'मुझे मेरी बिवी से बचाओ...' म्हणणाऱ्यांसाठी खास आश्रम  title=

विशाल करोळे, औरंगाबाद : तुमची बायको तुमचा छळ करते? तुमची बायको तुमचा नको जीव करते? काय करावं, हे तुम्हाला कळत नाहीय? अशाच पत्नीपिडीत पुरूषांसाठी एक आश्रम सुरू करण्यात आलाय. 

पुरूषांनो, तुमच्यावरही अशी वेळ कधी आलीय? मुझे मेरी बिवी से बचाओ... असं म्हणण्याची? पत्नीकडून होणाऱ्या छळाला तुम्हीही कंटाळला असाल तर औरंगाबादमधल्या या आश्रमाला नक्की भेट द्या... खास पत्नीपिडीत पुरूषांसाठीचा हा आश्रम आहे. मुळात एखाद्या पुरूषाला त्याची पत्नी छळते, यावर कुणीही सहसा विश्वास ठेवत नाही. उलट चेष्टाच करतात. पत्नीकडून होणारा छळ म्हणजे अवघड जागेचं दुखणं... सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. घरात पत्नीकडून आणि तिच्या माहेरच्यांकडून मारहाण सोसणारे पुरुष आपली व्यथा सांगायलाही लाजतात. अशा पुरूषांसाठी ही हक्काची जागा...

या ठिकाणी पत्नी पीडित पुरूषांचं कौन्सिलिंग होतं. घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार किंवा हुंडाबळी कायद्यान्वये केस दाखल झाली असल्यास न्यायालयीन मदत दिली जाते. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून कुणी आयुष्याचा शेवट करू नये, यासाठी हा आश्रम सुरू करण्यात आलाय, असं संस्थापक भारत फुलारे म्हणतात.  

आश्रमात पत्नी पीडितांसाठी निवास, भोजनासह सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या गेल्यात. यासाठी पत्नीच्या छळाला कंटाळलेल्यांनी फंडींग केलय. सध्या इथं 10 पुरूष राहतायत. त्यांना तिथं कामाची सोय कशी करता येईल, याचा विचार सुरूय. या आश्रमाच्या निमित्तानं पुरूषांवरच्या अन्यायालाही वाचा फुटेल, अशी अपेक्षा आहे.