'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत. 

Updated: Feb 9, 2016, 11:00 AM IST
'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा title=

मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत. ते एका अशा युनियनची स्थापना करणार आहेत ज्याचे सदस्य सरकारकडे आपला कर जमा करणे थांबवणार आहेत.  

अंजली दमानिया यांच्या मते जोपर्यंत सत्तेत आलेलं सरकार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि आणि माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांना अटक करत नाही तोपर्यंत या व्यक्ती कर भरणार नाहीत, असे दमानिया यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले.

आज दमानिया, पदमसी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांमध्ये पहिली बैठक होणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीचा शेअर होल्डर ज्या पद्धतीने त्या कंपनीला जाब विचारू शकतो त्याप्रमाणेच करदाते म्हणून ते सरकारला जाब विचारणार आहेत.

हे सर्व करण्यासाठी ते काही वकील मित्रांचीही मदत घेणार आहेत. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच आपले आंदोलन करण्याचा या व्यक्तींचा मानस आहे. लाखो करदात्यांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची त्यांना खात्री आहे.

पण, आता या व्यक्ती नक्की कोणता कर भरणार नाहीत याबद्दल मात्र काही कळू शकलेले नाही. कारण, प्रत्येक नागरिक दिवसाला अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर भरत असतो. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाबद्दल संभ्रम कायम आहे.