बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'!

हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...

Updated: Jan 7, 2016, 05:39 PM IST
बाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'! title=

आशिष अंबाडे, नेलगुंडा, गडचिरोली : हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...

बाबा आमटेंनी वसवलेलं आनंदवन, डॉ. प्रकाश आमटेंनी वसवलेलं हेमलकसा आणि आता अनिकेत आमटे नेलगुंडा वसवण्याच्या मागे लागलेत. आमटेंची ही तिसरी पिढी...


साधना विद्यालय, नेलगुंडा

बाबा जेव्हा वरोऱ्यामध्ये आले तेव्हा तो भाग दुर्गम होता. आनंदवनमधून बाहेर पडलेलले डॉ. प्रकाश आमटे हेमलकशाला आले... ते त्यापेक्षा जास्त दुर्गम... आणि हेमलकसापासून २५ किलोमीटरवर असलेलं नेलगुंडा हे आणखीनच दुर्गम ठिकाण... डॉ. प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आणि सून समीक्षा यांनी इथं एक शाळा सुरू केलीय. बाबांनी आखलेला मार्ग अधिक प्रशस्त करत आमटेंची तिसरी पिढी मार्गस्थ झालीय.

वर्षातले सहा महिने जगाशी संपर्क नाही... वीज नाही... पाणी नाही... रस्ता नाही... मोबाईलला रेंज नाही... मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही... अशा ठिकाणी अनिकेत आणि समीक्षा यांनी उभारलेली ही शाळा... शाळा तरी कशी? आनंदवन आणि हेमलकशाप्रमाणेच आपलं वेगळेपण जपणारी... निसर्गाच्या सानिध्यात, आदिवासी मुलांना समजेल-उमजेल अशा भाषेत शिक्षण देणारी... त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी...

पहिल्याच वर्षी या साधना विद्यालयाची पटसंख्या ५२ झालीये... ५-५ किलोमीटरची पायपीट करून एकही दिवस दांडी न मारता शाळा विद्यार्थ्यांसाठी एक समृध्द अनुभव ठरतोय. झपाट्यानं बदलणारं जग माडिया आदिवासींच्या चिमुकल्या मुठीत बंदिस्त करायचंय... अनिकेत आणि समीक्षा हा गोवर्धन लिलया पेलतील यात शंका नाही... कारण आमटेंच्या घरात बाळकडू मिळतं, तेच मुळी समाजसेवेचं...