ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर भाजप या राजकीय पक्षासाठी होत आहे, असा आक्षेप घेत निवडणूक आयोग का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभेत विचारला.
राज ठाकरे यांची जाहीर सभा ठाणे आणि भिवंडीत झाली. या सभेत राज यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. एरवी आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाचे व्हिडीओग्राफर उमेदवारांच्या मागे मागे जातात. पण मोदी यांच्याकडून राज्यात भाजपच्या प्रचारासाठी सरकारी विमाने, हेलिकॉप्टर आदी यंत्रणा वापरली जात असताना त्याचा जाब का विचारला जात नाही, असा बोचरा सवाल राज यांनी केला. मोदी यांच्यासोबत बंदोबस्तासाठी पोलीसदेखील गुजरातमधून आले. देशात अव्वल असणाऱ्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
देशाचे पंतप्रधान मोदी आपले पंतप्रधान कार्यालय बंद करून महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये प्रचाराच्या सभा घेत फिरत आहेत, आणि पाकिस्तान मात्र हल्ले करत आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देऊ, असे नितीन गडकरी म्हणाले होते. मग आता सरकार येऊनही ते कुठे उत्तर देत आहेत? पक्षाच्या प्रचारासाठी मोदींना वेळ आहे. मात्र, सीमेवर आपल्या जवानांनी केवळ शहीद व्हायचे का, असा हल्लाबोल राज यांनी केला.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन महाराष्ट्रात येऊन येथील उद्योजकांना महाराष्ट्रात काय ठेवलेय, तुम्ही तिकडे चला, असे सांगतात. मुंबईतील प्रकल्प गुजरातमधील पोरबंदरला हलवला जातो. गुजराती समाजाने येथे गुण्यागोविंदाने राहावे. गुजरातची खूपच आठवण येत असेल तर तिथेच जाऊन राहावे. देशाच्या पंतप्रधानासाठी सगळी राज्यं समान असायला हवीत. पण मोदी प्रचारसभांमध्ये, महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे न्यायचे आहे, असे आश्वासन देतात. मोदी देशातचे पंतप्रधान आहेत की, गुजरातचे, असा खोचक सवाल राज यांनी विचारला.
याआधी तुम्ही अनेकांना संधी दिल्यात. त्यांनी राज्याचे, शहरांचा विचका करुन ठेवलाय. माझ्या हाती बहुमत द्या. महाराष्ट्राच्या हिताच्या या व इतर अनेक गोष्टी आमच्याकडून होतील. आता एक प्रयोग करण्याची संधी मला द्या. तुम्हाला अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवून दाखवतो, असे आवाहन राज यांनी मतदारांना केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.