सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Updated: Oct 30, 2014, 12:06 PM IST
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग' title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास फडणवीस सरकारच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं सामनामध्ये म्हटलंय. त्याचवेळी नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचं सावध स्वागत करताना अप्रत्यक्षपणे अखंड महाराष्ट्राची हमीच फडणवीस सरकारकडे मागितली आहे... फडणवीसांची नागपूर लिंक वापरून वेगळा विदर्भ होऊ देणार नाही, असा गर्भित इशाराही सामनानं यावेळी दिलाय. 
बघुयात सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय...

नेमकं काय म्हटलंय 'सामना'च्या अग्रलेखात... पाहा,
महाराष्ट्राचे नेतृत्व विदर्भ करीत आहे व अखंड महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे. विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राने पोटाशी कवटाळला आहे व रायगडावरून त्याच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव स्मरणात ठेवावे! महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही मोकळ्या मनाने स्वागत करीत आहोत.

शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय? महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व कॉंग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला आहात व ज्या विदर्भातून आपण आला आहात त्याच विदर्भात जलसिंचनाचे मोठे घोटाळे राष्ट्रवादीवाल्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे देवेंद्र सरकारच्या पावित्र्याचा प्रश्नन सुरुवातीपासूनच निर्माण झाला आहे. सौभाग्यवतीप्रमाणे सरकारचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. सत्ताकारण सतीसावित्रीचे नसले तरी अगदीच ऐर्या गैर्यातच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे राज्य चालू नये. हे राज्य शिवरायांचे आहे व शिवरायांचे आशीर्वाद स्वस्त नाहीत. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे ते कायमचे गाडण्यासाठी; पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.