विकासाची ब्ल्यू प्रिंटने राज ठाकरे चमत्कार करतील?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय... ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्नं ते मतदारांपुढं मांडले आहे. 

Updated: Oct 1, 2014, 09:40 PM IST
विकासाची ब्ल्यू प्रिंटने राज ठाकरे चमत्कार करतील? title=

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय... ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्नं ते मतदारांपुढं मांडले आहे. 

बाळासाहेब ठाकरेंचा 'राजा'
राजकीय पक्ष चालवायचा म्हणजे भल्या सकाळी लवकर उठावं लागतं, असा चिमटा शरद पवारांनी राज ठाकरेंना उद्देशून काढला होता... राज ठाकरेंनीही तेव्हा पवारांना मार्मिक प्रतिटोला लगावला. मी घड्याळाचा गजर लावूनच झोपतो.. सकाळी पवार्रर्रर्रर्रर्र... पवार्रर्रर्रर्रर्र... अशा गजरानंच मला जाग येते... आपल्या विरोधकांना अक्षरशः गार करून टाकण्याची ही कला राज ठाकरे आपले काका बाळासाहेब ठाकरेंकडूनच शिकले... व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांनी बाळासाहेबांचाच कित्ता गिरवला. लाखालाखांच्या गर्दीच्या सभा कशा गाजवायच्या, याचं बाळकडू त्यांना मातोश्रीकडूनच मिळालं... बाळासाहेब ठाकरे त्यांना 'राजा' अशी हाक मारायचे. त्यांचा हा राजाच पुढं शिवसेनेची गादी सांभाळणार, असं एकेकाळी बोललं जायचं. पण नियतीनं वेगळाच इतिहास घडवला... राज ठाकरे विरूद्ध उद्धव ठाकरे हा संघर्ष जेव्हा टोकाला गेला, तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला... आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा राजकीय पक्ष जन्माला घातला... मळलेल्या वाटेनं न जाता, त्यांनी नव्या राजमार्गावरून वाटचाल सुरू केली.
 
'स्वर'राज ते राज ठाकरे

राज ठाकरे हे श्रीकांत ठाकरे आणि कुंदाताई ठाकरे यांचे चिरंजीव... पेशानं संगीतकार असलेल्या श्रीकांत ठाकरेंनी राज ठाकरेंचं 'स्वरराज' असं बारसं केलं. लहानपणी राज हे उत्कृष्ट तबला, गिटार आणि व्हायोलिन वादक होते. पण बाळासाहेबांच्या प्रभावामुळं ते तरूण वयातच राजकारणात उतरले आणि त्यांचा स्वर बदलून गेला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वगुणांना उजाळा मिळाला. युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा राज ठाकरेंचं शिवसेनेत मोठं वजन होतं. शिवउद्योग सेनेसाठी पॉपस्टार मायकल जॅक्सनला नाचवणं असो, नाहीतर बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोबायोग्राफीच्या प्रकाशनाला मान्यवरांची उपस्थिती असो, जे करायचं ते भव्यदिव्य, ही राज ठाकरेंची स्टाइल आहे.
 
राज ठाकरे... नव्हे 'वाद' ठाकरे

राज ठाकरे आणि वाद हे अतूट समीकरण आहे. अगदी शिवसेनेत असल्यापासून परप्रांतियांविरूद्ध त्यांची जीभ आणि हात कायमच चालले. मराठी मुलांना डावलून परप्रांतिय उमेदवारांना नोक-या देण्यास राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. रमेश किणी प्रकरण, इंग्रजी पाट्यांना काळं फासणं, मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांसाठी केलेलं खळ्ळ-फटॅक आंदोलन, नाहीतर बिहारींच्या छटपूजेला विरोध, राज ठाकरे नेहमीच हेडलाइन्समध्ये राहिले. अमिताभ बच्चन हा त्यांचा सुपरस्टार. पण मुंबईत राहून उत्तर प्रदेशची बाजू घेतात, म्हणून अमिताभनाही त्यांनी शिंगावर घेतलं. हिंदी बोलण्यावरून जया बच्चन यांच्याशी पंगा झाल्यानंतर, गुड्डी अब बुढ्ढी हो गयी है, अशी मल्लिनाथी राज ठाकरेंनी केली. पण त्याच अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. झालं गेलं गंगेला मिळालं, अशा शब्दांत त्यांनी वाद मिटवला. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे अशा महाराष्ट्रातल्या आयकॉन्सशी तर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. नरेंद्र मोदींवर चौफेर टीका होत असताना, गुजरातमध्ये जाऊन तिथल्या विकासकामांचं राज ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केलं. आणि त्याच मोदींवर लोकसभा निवडणुकीत टीकाही केली...
 
 मनसेचं भवितव्य काय?
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचं भवितव्य काय, असा सवाल केला जातोय... 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, त्यावेळी महाराष्ट्र विकासाची ब्ल्यू प्रिंट आणण्याची घोषणा केली होती. यंदा ते ब्ल्यू प्रिंट घेऊन, मतदारांना सामोरे जाणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी फारच निराशाजनक होती. मनसेमध्ये नवं चैतन्य आणण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय... आता राज ठाकरे खरोखरच निवडणूक लढवणार का? आणि मरगळलेल्या मनसेमध्ये नवी जान फुंकणार का? याकडं अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.