मुंबई : कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
काय म्हटलेय सामना अग्रलेखात?
पटेल-पवारांच्या फुल पॅण्टीला कैची उपटसुंभांचे राजकारण! राज्यात कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचा फायदा आणि गैरफायदा बरेच संधीसाधू घेऊ लागले आहेत. अर्थात राजकारण हे साधुसंतांचे राहिलेले नाही. त्यामुळे हे घडणारच. भलेही महाराष्ट्र भूमी ही साधुसंतांची खाण वगैरे मानली जात असली तरी येथेही सध्याच्या काळात जो तो आपापल्या फक्त मतलबाचेच पाहातो आहे. तसे नसते तर एका रात्रीत कोलांटउडी मारून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला नसता, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
मतमोजणीच्या आदल्या दिवशी भाजपचे नेते एकनाथ खडसे जाहीरपणे सांगतात की, ‘काही झाले तरी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही!’ बहुधा खडसे यांचे खडे बोल राष्ट्रवादीच्या कानात शिरले नसतील किंवा जन्मत:च कोडगेपणा अंगी भिनल्याने राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांनी निकालांचा गडगडाट सुरू असतानाच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला.
राष्ट्रवादीने म्हणे हा पाठिंबा महाराष्ट्राच्या विकासासाठी व स्थैर्यासाठी दिला. पटेलांना राज्याच्या विकासाची व स्थैर्याची चिंता कधीपासून वाटू लागली? जो पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याच्या लायकीचा उरला नाही व ज्या पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे सर्वाधिक आरोप आहेत, त्या पक्षाने अशा माकडचेष्टा कराव्यात यात नवीन काहीच नाही.
कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली? संघ परिवाराच्या हाफचड्डीचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान आहे.
अर्थात पवार-पटेल भाजप प्रेमाचे चंदन घासत आहेत ते काय महाराष्ट्रहितासाठी? आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबता आली तर पाहावीत हाच उदात्त हेतू दिसतोय. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभांतून ‘काका-पुतण्यांनी महाराष्ट्र कसा लुटला!’ याची हाळी दिली व पवारांचा पक्ष हा ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगितले.
विनोद तावडे आदी नेत्यांनी तर सत्ता येताच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली आहे. हे सर्व लक्षात घेता पटेल यांनी उगवत्या सूर्यासमोर लोटांगण का घातले हे समजण्यासारखे आहे. वास्तविक राज्याचे निकाल अधांतरी लागले असले तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टपणे नाकारण्याचे कर्तव्य राज्याच्या जनतेने बजावले आहे.
शिवसेना-भाजपमधील मतविभागणीचा फायदा काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीस उपटता आला. त्या उपटण्यामुळे जर भ्रष्ट उपटसुंभांना ‘किंगमेकर’ होण्याची स्वप्ने पडत असतील तर खडसे-तावडे वगैरे नेत्यांनी पटेलांच्या घोटाळेबाज भूमिकेवर आताच शरसंधान केले पाहिजे. पटेल हे विदर्भातील नेते आणि व्यापारी आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा किडा पटेलांच्या डोक्यातही वळवळत असला पाहिजे, पण त्यांच्या पक्षाला विदर्भात जेमतेम एका जागेवर समाधान मानावे लागले ही वस्तुस्थिती आहे.
भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा विदर्भात मिळाल्याने त्यांचा आकडा मोठा झाला. याचा अर्थ विदर्भाचा कौल हा महाराष्ट्रातून तुटण्याचा आहे असा मानता येत नाही. त्याच विदर्भात शिवसेनेचे खासदार आहेत व त्यांची भूमिका महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची आहे आणि त्यात तसूभरही बदल होणार नाही, पण पटेल वगैरे मंडळी ज्या प्रकारे आपले घोडे दामटवीत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या भूमिकेचे हसे होत आहे. जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीस लोळवले तरी चिखलात माखलेले थोबाड घेऊन ते ‘जिंकणार्याच्या मागे उभे राहून’ फोटोत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. फोटोमध्ये याल हो, पण चिखलामुळे तुमचे थोबाड खराब झाल्याने चेहराच ओळखता येत नाही त्याचे काय?
महाराष्ट्राचे राजकारण व सत्ताकारण पारदर्शक, स्वच्छ व्हावे व शुद्ध, निर्मळ विचारांचे आणि विकासाचे झरे येथे वाहावेत. भ्रष्ट चिखलाने माखलेले लोक या गंगेत उतरून पवित्र होण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यामुळे राज्याची गंगा पुन: पुन्हा गढूळ होऊ नये इतकीच आमची इच्छा आहे व ही भूमिका महाराष्ट्रहिताची असल्यानेच आम्ही ठामपणे मांडली. बाकी प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.