Nora Fatehi In Ratnagiri Dance On Zingaat: सध्या लग्नसराईचा सिझन सुरु झाला आहे. तुमच्यापैकी अनेकांचे लग्नांना हजेरी लावण्याचे प्लॅनिंगही झालं असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या एका खास लग्न चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे लग्न कोकणातील एका छोट्याश्या गावात झालं. या लग्नाच्या हळदीला सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर असलेले नोरा फतेही हजर होती. तिनेच या लग्नाला ती कशी कोकण रेल्वेने प्रवास करुन रत्नागिरीपर्यंत पोहचली आणि त्यानंतर हळदी समारंभात कशी मज्जा केली याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून कोकणातील अनेक चाकरमानी थक्क झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.
नोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने कशाप्रकारे दादर रेल्वे स्टेशनवरुन ट्रेनने रत्नागिरी गाठलं आणि प्रवासात काय काय केलं याचबरोबर हळदी सोहळ्यातील डान्सचा व्हिडीओही शेअर केला आहे. "अनुप सुर्वेच्या लग्नाच्या हळदीला मी रत्नागिरीला गेले होते तेव्हाचा हा मिनी व्हॉग! आम्ही ट्रेनने या सोहळ्यासाठी गेलो होतो. हा फार छान अनुभव होता. या ब्लॉगचा दुसरा भाग लवकरच पोस्ट करणार आहे," असं नोराने म्हटलं आहे.
तसेच अगदी आपण ज्याच्या लग्नाला गेले होते तो अनुप कोण आहे याची माहितीही दिली. "ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी सांगते की अनुप हा माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये 8 वर्षांपासून आहे. माझा 2017 पासूनचा प्रवास त्याने त्याच्या कॅमेरामधून टीपला आहे. आता या सोहळ्यानिमित्त तो कॅमेरासमोर आलाय. काहीही झालं तरी माझ्या पाठीशी राहणाऱ्या या व्यक्तीच्या आयुष्यातील खास क्षण आम्ही साजरा केला. वैवाहिक जीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अनुप," अशी कॅप्शन नोराने दिली आहे.
नोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिला अनुपच्या घरच्यांनी साडी भेट दिली. नोराने अनुपची हळद मनापासून एन्जॉय केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नोराने हळदीला 'अग्नीपथ' (2012) चित्रपटामधील 'चिकनी चमेली', 'सैराट' (2016) चित्रपटामधील 'झिंगाट' आणि 'दिलबर' गाण्यावरही डान्स केला.
नोराच्या या व्हिडीओवर अनेकांनी एका सहकाऱ्याच्या हळदीसाठी एवढा प्रवास करुन गेल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. अनेकांनी खरोखरच नोराला कोकणातली हळद या निमित्ताने अनुभवता आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.