शिवसेनेच्या १३ जागा भाजपने गटवल्या

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली आणि कोणं किती जागा निवडून आणतंय याची उत्सुकता वाढली. त्यातल्या त्यात कोण कुणाच्या किती जागांवर डल्ला मारणार हा देखिल उत्सुकतेचा विषय होता.

Updated: Oct 22, 2014, 11:01 AM IST
शिवसेनेच्या १३ जागा भाजपने गटवल्या title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेची युती तुटली आणि कोणं किती जागा निवडून आणतंय याची उत्सुकता वाढली. त्यातल्या त्यात कोण कुणाच्या किती जागांवर डल्ला मारणार हा देखिल उत्सुकतेचा विषय होता.

युती तुटल्यानंतर ५० जागांवर भाजप व शिवसेना यांच्यात थेट लढत झाली. तर, मागील निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या १३ जागा भाजपने आपल्याकडे खेचून आणल्या. 

मात्र भाजपकडील फक्त एका जागेवर शिवसेनेला विजय मिळाला. शिवसेना व भाजप एकत्र लढले असते, तर निकाल वेगळे लागले असते, हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

विधानसभा निवडणुकीतील पूर्वीच्या सूत्रात बदल करुन काही जागांची फेरवाटणी करावी व काही जास्तीच्या जागा मिळाव्यात, अशी भाजपची मागणी होती. 

मात्र शिवसेना १५० पेक्षा कमी जागा घ्यायला तयार झाली नाही व काही खास जागांची अदलाबदल करण्यासही नकार दिला होता. त्यावरुन खूप ताणाताणी झाली आणि अखेर युती तुटली. 

साहजिकच त्यामुळे २५ वर्षांनंतर शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच लढले.

त्याचा दोन्ही पक्षांना थोडा फायदा व बराच तोटा झाला. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या परंतु स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही.

मागील २००९ च्या निवडणुकीत भाजपने ४६ व शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या होत्या.

या वेळी युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. त्यात भाजपने शिवसेनेच्या जिंकलेल्या ४४ पैकी १३ जागा आपल्याकडे खेचून आणल्या.

 शिवसेनेला भाजपकडील ४६ जागांपैकी फक्त भिवंडी ग्रामीण या जागेवर विजय मिळविता आला. त्याचबरोबर या वेळी थेट लढतीत भाजपने शिवसेनेचा ३० जागांवर तर, शिवसेनेने भाजपचा २० जागांवर पराभव केला.

भाजपने शिवसेनेकडील जिंकलेल्या जागा
 जळगाव शहर, अकोट, दर्यापूर, हिंगणघाट, रामटेक, भंडारा, ठाणे, दहिसर, गोरेगाव, कोथरूड, हडपसर, कोपरगाव आणि बदनापूर.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.