मुंबई : राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बहुमतात सरकार आले नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेवर दबावतंत्र अवलंबिल्याचे धोरण सुरु आहे. जर सेनेचा पाठिंबा मिळाला नाहीतर अल्पमतात सरकार बनवायचे आणि मुंबईला जास्तीत जास्त मंत्रिपदे देण्याची व्युहरचना करण्यात येत आहे.
भाजप मुंबईतील काही चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकसभा आणि आता विधानसभेत भाजपने चांगले यश मिळाले आहे. शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त मिळाली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. शेलार यांच्यापाठोपाठ पाचव्यांदा निवडून आलेले राज पुरोहित यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे. महिला चेहराही मंत्रिमंडळात दिसू शकतो.
दहिसरमधून निवडून आलेल्या मनीषा चौधरी आणि गोरेगावमधून निवडून आलेल्या विद्या ठाकूर यांचाही समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चौधरी या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष असून डहाणूच्या नगराध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. चार वेळा नगरसेविका आणि उपमहापौरपद भूषवलेल्या विद्या ठाकूर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. मुलुंडमधील सरदार तारासिंग हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे आता सरकार अल्पमतातील बनणार की शिवसेनेला घेऊन, त्यावर मुंबईच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतात हे ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.