भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम

भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याबाबत अद्याप संभ्रम काय आहे. एकीकडे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी स्वतःहून शिवसेनेची मदत मागायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

Updated: Oct 22, 2014, 09:22 PM IST
भाजप-सेना सरकारबाबत संभ्रम कायम  title=

मुंबई : भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याबाबत अद्याप संभ्रम काय आहे. एकीकडे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी स्वतःहून शिवसेनेची मदत मागायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

प्रचारकाळात डरकाळ्या फोडणारा शिवसेनेचा वाघ आता नरमल्याचं चित्र आहे. सुरुवातीला भाजपाकडून प्रस्ताव आला तरच पाठिंबा देऊ अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आता अचानक आपली भूमिका बदलली आहे. भाजपाचे नेते किंमत देत नसतानाही पाठिंबा देण्यासाठी आता शिवसेनेची धावपळ सुरू झाली आहे. यासाठी शिवसेनेचे दोन दूत दिल्लीत भाजपा नेत्यांच्या भेटीसाठीही गेले, मात्र तिथेही भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टाळले आणि शिवसेनेच्या या दूतांना हात हलवत मातोश्रीवर परतावे लागले.

दिल्लीत काहीही घडले नसताना, दिल्लीत काय घडले याची माहिती देण्यासाठी शिवसेनेचे दूत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले. सुरुवातीला अखंड महाराष्ट्र, मंत्रीमंडळात निम्मा वाटा अशा अटी भाजपासमोर ठेवणाऱ्या शिवसेनेने यावरही यु टर्न घेऊन बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

वारंवार पक्षाच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत.

काहीही करून सत्तेमध्ये सामील व्हायला हवं, असं एका गटाला वाटतंय. गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना सत्तेबाहेर आहे. शिवसेनेनं पाठिंबा दिला नाही तर भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेईल. सत्तेत सहभागी झालो नाही तर दोन वर्षांनी होणा-या महापालिका निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकेल, असं या गटाला वाटतंय. या गटात सुभाष देसाई, अनिल देसाई आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते आदी नेत्यांचा समावेश आहे.

मात्र शिवसेनेनं प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी, असं ठाम मत असणारा दुसरा गट शिवसेनेत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपपुढे अजिबात झुकले नसते... भाजपकडून अपमानित होण्यापेक्षा आणि पाच-सहा मंत्रीपदाची खैरात पदरात पाडून घेण्यापेक्षा, विरोधी बाकांवर बसणं बाळासाहेबांनी पसंत केलं असतं, असं या गटाला वाटतंय. या गटामध्ये संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम अशा नेत्यांचा समावेश आहे.

शिवसेनेतच हे दोन गट असल्याने कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे पेच निर्माण झालाय. त्यातच भाजपाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेची अवस्था लग्नाला येऊ नको म्हटलं तर कुठल्या गाडीत बसू अशी झाल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळे आता यासंदर्भात निर्णय़ घेताना उद्धव ठाकरेंची कसोटी लागणारच आहे. कारण कोणताही निर्णय घेतला तरी शिवसेनेला दोन्ही बाजूने टीकेला सामोरं जावं लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.