मुंबई : पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा नवा सिनेमा 'बजरंगी भाईजान'ला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. मात्र काश्मीरशी संबंधित काही वाक्य हटवण्यात आल्यानंतरच, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार आहे. ईदच्या दिवशी १७ जुलै रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.
'बजरंगी भाईजान' सकारात्मक सिनेमा
सिंधचे सेन्सॉर बोर्ड प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगी भाईजान हा एक चांगला सिनेमा आहे, सकारात्मक आहे, आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोकांना सकारात्मक पद्धतीने सादर करण्यात आलं आहे.
पाकिस्तानने सेन्सॉरने नेमका कोणता सीन हटवला?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दृश्यात सलमान खान एका पाकिस्तानी मौलवीला एक सुंदर आणि हिरव्यागार पहाडी भाग दाखवतो, आणि विचारतो या पहाडी भाग कोणता आहे? तेव्हा मौलवी साहेब म्हणतो, (ओमपुरी यांनी मौलवीची भूमिका साकारली आहे) हा काश्मीर आहे असं म्हणतात.
यावर सलमान खान म्हणतो, मला तिथे जाण्यासाठी पुन्हा भारतात परत जावं लागेल, यावर मौलवी पुन्हा म्हणतो, 'नाही छोटासा काश्मीर आमच्याकडेही आहे'.
पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने हे वाक्य हटवून सिनेमा रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. या आधी म्हटलं जात होतं की, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार नाही, कारण यात पाकिस्तानशी संबंधित वादग्रस्त विधानं आहेत.
काय आहे चित्रपटाचं कथानक
सलमान खानने 'बजरंगी भाईजान'ची भूमिका साकारली आहे. एक पाकिस्तानी मुलीला त्याच्या देशात सलमान परत सोडायला जातो. भारतात तीर्थ यात्रेवर आलेल्या परिवारापासून ही मुलगी हरवलेली असते. या मुलीला पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी भारतीय कशी मदत करतात ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत यावरही जोर देतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.