सलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी

2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली. 

Updated: Jun 24, 2014, 03:53 PM IST
सलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी  title=

मुंबई: 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली. 

घटनास्थळी आपण सलमान खानला पाहिलं नसल्याचं सांगत, सचिन कदमने पोलिसांना दिलेली जबानी बदलली. मात्र सलमान खानच्या गाडीच्या धडकेनं जखमी झालेला मोहम्मद अब्दुल्ला शेख यानं मात्र सलमानला ओळखलंय. 

सलमानच्या गाडीनं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना चिरडल्याचं त्यानं न्यायालयात सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत 12 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यात. उद्या इतर साक्षीदारांच्याही साक्षी नोंदवल्या जाणार आहेत.
 
28 सप्टेंबर 2002ला अभिनेता सलमान खान 'रेन बार'मध्ये आपल्या मित्रांसोबत दारू प्यायला होता आणि दारू नशेत गाडी चालवत वांद्रे इथल्या बेकरीमध्ये त्याची कार घुसली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर इतर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी आता साक्षीदार सचिन कदमनं आपली जबानी फिरवलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.