हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डग्गुबाट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे. या फिल्मच्या शूटिंगसाठी त्याने नुकतंच आठ दिवस रात्री पाण्याखाली शूटिंग केलंय.
त्याच्या फिल्ममधला हा एक महत्त्वाचा सीन आहे. त्यासाठी त्याने हे कष्ट घेतल्याचे त्याने 'डीएनए' वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. हैदराबाद शहरात एका भल्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये एका पाणबुडीचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. यात पाणबुडीचे सहा विभाग तयार करण्यात आले आहेत.
राणा स्वतः डायव्हिंग शिकला आहे. त्यामुळे त्याला हे सीन शूट करण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. फक्त त्याच्या पोहण्याच्या सवयीचा थोडे दिवस करावा लागला.
गाझी ही फिल्म पाकिस्तानी पाणबुडी युद्धनौका 'गाझी'वर आधारित आहे. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तीच्या युद्धात भारताला या पाणबुडीला विशाखापट्टणम मध्ये जलसमाधी देण्यास यश आले होते.
या चित्रपटाचे शूटिंग मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात संपले, असे राणाने सांगितले आहे. हा चित्रपट २०१६ सालीच तेलुगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.