मुंबई : स्वत:ला कॉमेडीयन म्हणवणाऱ्या तन्मय भट्टला लता दीदींनी नामोल्लेख न करता टाळला असलं, तरी त्यांच्या बहिणी आशा भोसले आणि मीना खाडीकर यांनी मात्र आपली नाराजी व्यक्त केलीय.
'मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही, आणि मला पाहायचाही नाही. माझा नातू चिंटूनं मला याबद्दल सांगितलं... मी तर टीव्हीही पाहिलेला नाही. एका महिलेनं (लता दीदी) आपल्या संगितातून गेली ७०-८० वर्ष लोकांना आनंद दिलाय... आता मला मी फक्त थांबणार आणि पाहणार आहे किती लोक आमच्या बाजुनं उभे राहातायत' असं एकप्रकारे आवाहनच आशा भोसले यांनी केलंय.
'अनेक लोक काही दिवस चर्चा करतात आणि विसरून जातात... आपल्या देशात, भारत रत्नाचा किती आदर आहे हे बघायचं आहे. सरकारनं या लोकांना मान दिला आहे... त्यांनी याची नोंद घेणं गरजेचं आहे' असंही आशा भोसले यांनी म्हटलंय.
आम्हाला ही व्यक्ती कोण आहे हेदेखील माहीत नाही. किंवा आम्ही याविषयी लतादीदींशीही चर्चा केलेली नाही. टीव्हीवरही तोच तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवला जातोय. गेल्या दोन दिवसांपासून आमचा फोन सतत खणखणतोय. पण, या व्हिडिओ विषयी बोलणं म्हणजे त्याला नाहक महत्त्व देणं... आपण हे टाळू शकतो' असं लता दीदींची बहिण मीना यांनी म्हटलंय.
सचिननं खूप कमी वयात खूप काही कमावलंय. त्याला लता दीदींविषयी खूप आदर आहे... आणि लतादीदींनी त्याच्याविषयी... हे दोघांचाही 'भारतरत्न' म्हणून गौरव करण्यात आलाय. त्यांच्याविषयी कॉमेडीच्या नावावर काहीतरी घाणेरडं बोलायचं म्हणजे तिरस्कारणीय प्रकार आहे, असं म्हणत मीनाताईंनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलिवूडमध्ये यापूर्वीच अनुपम खेर, रितेश देशमुख, परेश रावल आणि सुभाष घई यांनी तन्मयच्या या व्हिडिओची निंदा केलीय.
तर अभिनेत्री सोनम कपूर हिनं आपला मित्र असलेल्या तन्मयची बाजू घेत हा विषय टाळावा, असं म्हटलंय.