मुंबई : भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणाऱ्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. मात्र असहिष्णुततेवर बॉलिवूडमधील खान मित्रमंडळींच्या विधानांसोबत ती सहमत नाहीये. कतरिनाच्या मते भारत हा एक खूप सहनशील देश आहे.
बॉलिवूड कलाकार आमिर खान आणि शाहरुख खान यांनी देशात असहिष्णूता वाढत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे दोघांना बराच आर्थिक फटकाही बसला होता. त्यांच्या या विधानाला अभिनेता अनुपम खेर आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी बराच विरोधही केला होता.
आपल्या 'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना दिल्लीत आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, असहिष्णुतेच्या वादाची मला कल्पना आहे. पण, मला वाटतं की भारत एक खूप सहनशील आणि खास देश असल्याचे कतरिना म्हणाली. तसेच 'जेव्हा मी भारतात पहिल्यांदा आले तेव्हा मला वाटलं की मी माझ्या घरी परतले आहे. इथल्या लोकांचं प्रेम जे मिळतं ते कुठेच मिळू शकत नाही. मला आयुष्यभर भारतात राहायचे आहे, असे कतरिनाने सांगितले.