मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय.
करीनानं २०१२ मध्ये बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला होता. परंतु, यावेळी तिनं आपला धर्म न बदलण्याचा निर्णय घेतला होता.
‘लव्ह जिहाद’ या सध्या चर्चेत असलेल्या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करीनानं आपलं केवळ प्रेमावर विश्वास आहे असं म्हटलंय. ‘लव्ह जिहाद’ या विषयावर एक खुलं पत्र लिहून करीनानं आपले विचारही लोकांसमोर मांडलेत.
सैफ हा खूप खुल्या विचारांचा आहे, असं करीनानं यावेळी आवर्जुन सांगितलंय.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर खानदानातच्या लाडक्या करीना म्हणते, ‘मला वाटतं की प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जिला तुम्ही एखाद्या व्याख्येमध्ये बसवू शकत नाहीत. यामध्ये, आवड, उत्साह आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेमात धर्मासारखी कोणतीही भिंत आडवी येऊ शकत नाही’.
‘एखादा हिंदू मुलगा असेल आणि तो एखाद्या मुस्लिम मुलीवर प्रेम करत असेल तर तुम्ही त्याला रोखू शकत नाहीत. तू हिंदू आहेत की मुसलमान? असा प्रश्न विचारून मग तुम्ही कुणाच्या प्रेमात पडत नाहीत’ असंही करीनानं म्हटलंय.
करीनाचा आगामी सिनेमा ‘बजरंगी भाईजान’मध्ये एक ब्राह्मण मुलगी आणि एका मुस्लिम मुलाची प्रेमकहाणी रंगवण्यात आलीय. कबीर खानच्या या सिनेमात सलमान खानही मुख्य भूमिकेत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.