नवी दिल्ली : वारंवार वादात अडकणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या बदलांची तयारीही सुरू केलीय.
सेन्सॉर बोर्डाला एक नवं रुप देण्यासाठी सरकारनं एका समितीची स्थापना केलीय. या समितीची सूत्रं प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडे सोपवण्यात आलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. ही कमिटी सेन्सॉर बोर्डात जरुरी असलेल्या बदलांबद्दल दोन महिन्यांमध्ये रिपोर्ट सादर करणार आहे.
या कमिटीत श्याम बेनेगल यांच्याशिवाय सिनेदिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, सिनेसमीक्षक भावना सोमैय्या, अॅग गुरु पीयूष पांडे यांना सहभागी करून घेण्यात आलंय. ही समिती, सेन्सॉर बोर्डाच्या स्टाफिंग पॅटर्नमध्येही बदल सुचवणार आहे.
श्याम बेनेगल यांच्यासारख्या व्यक्तीला ही जबाबदारी देण्यात आल्याबद्दल सिनेजगतानंही समाधान व्यक्त केलंय. श्याम बेनेगल यांना ही जबाबदारी देणं हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, असहिष्णुतेच्या वादात आपली वेगळी भूमिका मांडत याविषयी आवाज उठवणं गरजेचं असलं तरी अवॉर्डवापसी हा मार्ग योग्य नसल्याचं मत बेनेगल यांनी व्यक्त केलं होतं.