मुंबई : देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात लेखकांपाठोपाठ आता चित्रकर्मींनीही एल्गार पुकारलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटकार आणि दिग्दर्शकांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले आहेत.
कुलबुर्गींची, पानसरेंची हत्या आणि एफटीआयआयमध्ये संचालक नियुक्तीबाबत झालेल्या वादाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये आनंद पटवर्धन, दिबाकर बॅनर्जी, परेश कामदार, लिपीका सिगं, निष्ठा जैन, किर्ती नखवा आणि हर्ष कुलकर्णींचा समावेश आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन हे पुरस्कार परत करत असल्याची घोषणा दिग्दर्शकांकडून करण्यात आली. मी येथे कोणताही राग अथवा टीका करण्यासाठी आलेलो नाही पण एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले गेले पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे मला मनापासून वाटते. 'कोसला का घोसला'साठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करणे हे माझ्यासाठी सोपे नसले तरी सध्या देशात सुरू असलेल्या या घटना पाहता त्याचा निषेध व्यक्त करणे मला महत्त्वाचे वाटते, असे दिबाकर बॅनर्जी यावेळी म्हणाले.
तर, देशातील वातावरण गढूळ झाल्याने अस्वस्थ असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी दिली. दरम्यान, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आजच १३९ दिवसांनंतर आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. तर आपला लढा यापुढे सुरुच राहील, असेही स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.