फिल्म रिव्ह्यू : इरफानचा 'जज्बा' छा गया!

Updated: Oct 10, 2015, 10:27 AM IST
फिल्म रिव्ह्यू : इरफानचा 'जज्बा' छा गया! title=

 

चित्रपट : जज्बा
निर्माते - लेखक - दिग्दर्शक : संजय गुप्ता 
कलाकार : ऐश्वर्या राय - बच्चन, इरफान खान, शबाना आझमी, जॅकी श्रॉफ

मुंबई : रुपेरी पडद्यावर ऐश्वर्या राय-बच्चनचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' आपल्या भेटीला आलाय. 

दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक संजय गुप्ता यांनी याआधी आतिश, काँटे, मुसाफिर, शूटआऊट अॅट लोखंडवाला आणि शूटआउट अॅट वडाळा असे सिनेमे दिले. यानंतर आता जज्बा हा सिनेमा घेऊन ते पुन्हा आपल्या भेटीला आलेत. 

साऊथ कोरीयन सिनेमा 'सेव्हन डेज' या सिनेमाचा जज्बा हा सिनेमा रिमेक आहे. जवळ जवळ पाच वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ऐश्वर्यानं या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय. 

कथानक
ही गोष्ट आहे अनुराधा वर्मा (ऐश्वर्या राय - बच्चन) या महिलेची, जी प्रोफेशननं एक यशस्वी वकील आहे. अनुराधाच्या मुलीचं अपहरण होतं. एका गुन्हेगाराची केस अनुराधाकडे असताना हा प्रकार घडतो. अनुराधा जर ही केस हरली तरच तिला तिची मुलगी सुखरुप परत मिळेल, असंही अनुराधाला धमकावण्यात येतं. तिच्या या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी तिची मदत करायला इन्सपेक्टर योहानची (इरपान खान) एन्ट्री होते.. योहान हा एक सस्पेंडेड पोलिस ऑफिसर असतो. अनुराधा ही केस हारते का? तिची मुलगी तिला सुखरुप परत मिळते का? यासाठी तुम्हाला सिनेमा पहावाच लागेल. ऐश्वर्या आणि इरफानसाबतच जज्बामध्ये अभिनेत्री शबाना आझमी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाची व्यक्तिरेखा आहेत. 

या सिनेमाची कथा खरं तर या सिनेमाचा यूएसपी आहे. 'सेव्हन डेज' या साउथ कोरियन सिनेमानं प्रेरित अशा जज्बा या सिनेमाचं प्लॉटींग, लोकेशन्स, सिनेमाची गती या सगळ्या गोष्टी छान जमून आल्यात. या सिनेमाची सिनेमेटोग्राफी खूपच इनोव्हेटीव्ह वाटतेय. विशेष करुन सिनेमा ज्या पद्धिनं शूट करण्यात आलाय, तो प्रत्यक्ष पाहताना तुम्हाला मजा येईल. 

अभिनय
कलाकाराच्या अभिनयाबाबत सांगायचं झालं तर जज्बामध्ये ऐश्वर्या बच्चनचा परफॉरमन्स हवा तितका दमदार वाटत नाही. तिचा अभिनय, संवाद फेकीची शैली या सगळ्या गोष्टी बनावटी वाटतात. इन शॉर्ट तिचा अभिनय खूपच बनावटी वाटतो.

अभिनेता इरफान खान या सिनेमात 'छा गया है' असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा इरफाननं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्व:तला सिद्ध केलंय. त्याच्या वाटयाला आलेले संवादही खूपच इंटरेस्टिंग वाटतात. याचबरोबर शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, सिद्धांत कपूर यांनीही छान परफॉर्मन्स दिलाय.

संगीत
सिनेमाच्या संगीताविषयी सांगायचं झालं तर यातलं बॅकग्राउंड म्युझिक खरंच छान झालंय. सिनेमाचा मूड कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरतं. 'सरफिरा' हे गाणंही उत्तम जमलंय. 

सिनेमाची कथा जरी साधी सिंपल असली तरी सिनेमाची मांडणी फसलीय, असं वाटत राहतं. सिनेमातल्या प्रमुख व्यक्तिरेखांचा अभिनय पाहता, सिनेमाची थीम वर्क आऊट होत नाही. एका आईच्या भावना मांडण्यात सिनेमा मागे पडतो.

हे सगळे एलिमेंन्ट्स पाहता आणि केवळ इरफान खानसाठी आम्ही या सिनमाला देतोय 3 स्टार्स... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.