चित्रपट : बायकर्स अड्डा
निर्माता : विजय हरिया आणि प्रमोद लोखंडे
दिग्दर्शक : राजेश लाटकर
अॅक्शन डिरेक्टर : प्रशांत नाईक
कलाकार : संतोष जुवेकर, प्रार्थना बेहेरे, श्रीकांत मोघे आणि इतर
मुंबई : संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहरे स्टारर 'बायकर्स अड्डा' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक राजेश लाटकर यांचा 'बायकर्स अड्डा' हा पहिलाच सिनेमा.
कथानक
'बायकर्स अड्डा' ही गोष्ट आहे यासिनेमातल्या चार बायकर्सची आणि त्यांच्या 'डी फाईव्ह' या ग्रुपची... 'विकी'ची भूमिका साकारली आहे अभिनेता संतोष जुवेकरनं, विकीला बाइकचं भरपूर पॅशन आहे... विकी अनाथ आहे, त्याला क्रिशनं वाढवलंय... 'क्रिश' हा एक माजी स्टंट बायकर असतो. काही कारणामुळे क्रिश हा स्टंट करणं सोडतो. एव्हढच नाही तर तो विकीलाही स्टंट्स करु देत नाही. पण स्टंटस् हे विकीसाठी पॅशन असल्यामुळे तो डी फाईव्ह या बायकर्स ग्रुपमध्ये सामील होतो आणि त्यांचा हा ग्रुप एका शर्यतीत उतरतो.
दिग्दर्शक राजेश लाटकर यांचा बायकर्स अड्डा हा पहिलाच सिनेमा... खरंतर आपल्या पहिल्याच सिनेमासाठी असा विषय हाताळणं हेच एक मोठं चॅलेंज आहे. सिनेमाची कथा जरी चांगली असली तरी पटकथा ही भरकटलेली आहे. दिग्दर्शकानं हा विषय हाताळताना सिनेमाच्या मांडणीकडे दूर्लक्ष केलंय. सिनेमाचा मूळ विषय हा बायकर्सनं सादर केलेले स्टंटस् असल्यामुळे, दिग्दर्शकानं जास्तीत जास्त लक्ष यातल्या अॅक्शन सीन आणि वेगवेगळ्या स्टंट्सवर केंद्रीत केलंय. सिनेमातले स्टंट्स हे नक्कीच मनाचा थरकाप उडवणारे आहेत. मराठी बिग स्क्रीनवर या निमित्तानं एक वेगळा प्रयोग करण्यात आलाय एवढं मात्र नक्की...
अॅक्शन आणि ग्लॅमर
सिनेमाची पटकथा अनेकदा खटकते, केवळ स्टंट्सवर फोकस करुन कसं चालेल... हा विचार खरंतर दिग्दर्शकानं करायला हवा होता. सिनेमात अॅक्शन तर आहेत पण सिनेमाला ग्लॅमरही मिळावं यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेची निवड करण्यात आलीय. 'बायकर्स अड्डा'मध्ये तिची तशी काही खूप महत्वाची भूमिका आहे? तर तसंही नाही... केवळ ग्लॅमर कोशंटसाठी प्रार्थनाला सिनेमात घेण्यात आलंय की काय, असं सिनेमा पाहताना जाणवतं... बरं सिनेमाची गरज नसली तरी काही गाणी सिनेमात घुसवण्यात आली आहेत.
संतोष जुवेकरचा मात्र या सिनेमातला परफॉर्मन्स चांगला झालाय़. त्याचा लूक, त्याची स्टाइल भाव खाऊन जाते. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही 'बायकर्स अड्डा' या सिनेमाला देतोय 2.5 स्टार्स...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.