जयंती वाघधरे, मुंबई : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे प्रस्तुत आणि डॉ. अंबरीश दरक दिग्दर्शित अनुराग हा सिनेमाही आज सिल्वर स्क्रीनवर झळकलाय.
'अनुराग' ही गोष्ट आहे एका जोडप्याची आणि त्यांच्या हरवलेल्या प्रवासाची... सौम्या आणि रिषभ या दोघांची ही कहाणी... सौम्या आई होऊ शकत नाही, ज्यामुळे ती खचून जाते... तिच्या जिवनात काही वेगळं ध्येयच राहत नाही.
याच गोष्टीमुळे पुढे तिच्या आणि रिषभच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा वाद होतात. आपल्या बिजी शेड्युलमध्ये कायम गुंतलेला रिषभ सौम्याला आधार तर दूरच आपला वेळही देऊ शकत नाही. ज्यामुळे या दोघांमधला दुरावा आणखीनच वाढतो. मग एक दिवस हे दोघंही आपआपली वाट शोधायला निघतात... मग काय घडतं...? या दोघांना आपली हरवलेली नाती परत मिळते का? या दोन पात्रांचा एक अनोखा प्रवास यात दिग्दर्शक डॉ अंबरिश दरक यांनी अनुराग या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
'अनुराग' हा सिनेमा नेहमीपेक्षा जरा वेगळ्या जॉनरचा आहे. केवळ दोन पात्रांभोवती हा सिनेमा फिरतो. लेहलडाखसारख्या अत्यंत देखण्या लोकेशन्समध्ये या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलंय.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात तिनं आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा हटके व्यक्तिरेखा यात साकारली आहे. धरम गोहिल या नटाला आपण याआधी केदार शिंदे यांच्या 'अगं बाई अरेच्च्या - दोन' या सिनेमात पाहिलं होतं. या सिनेमातही धरमच्या वाट्याला चांगली भूमिका आली आहे, जी त्यानं चोखपणे पार पाडली आहे. राहिला प्रश्न मुण्मयीच्या परफॉर्मन्सचा तर या सिनेमात तिच्या दोन वेगवेगळ्या शेड्स पहायला मिळतात. या दोन्ही शेड्स तिनं छान पार पाडल्या आहेत.
'अनुराग' सिनेमात जी गोष्ट खटकते ती म्हणजे या सिनेमात त्याच त्याच गोष्टी रिपीट झाल्या आहेत. सिच्युएशन जरी वेगळ्या असल्या तरी त्याला हॅन्डल करण्याची पद्धत मात्र तीच... सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकच सूर ताणला गेलाय. सिनेमाचे संवाद जरी चांगले असले तरी ते किती प्रमाणात आणि कुठे वापरायचे? याचं गणित सोडण्यात दिग्दर्शक थोडा मागे पडलाय.
अनुराग हा सिनेमा केवळ मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आलाय, याचं कारण असं की कदाचित सिंगल स्क्रीन थिएटरचा प्रेक्षक हा सिनेमा पचवू शकणार नाही. हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही अनुराग या सिनेमाला देतोय तीन स्टार्स...