'सैराट'मधील आर्चीच्या यशामागील मेहनत तुम्हाला माहीत आहे का?

 आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने सिनेमात काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिच्या यशातून दिसत आहे.

Updated: May 11, 2016, 04:41 PM IST
'सैराट'मधील आर्चीच्या यशामागील मेहनत तुम्हाला माहीत आहे का? title=

मुंबई : नागराज मुंजळे यांचा 'सैराट' तुफान घौडदौड करत आहे. मराठी सिनेमा जगतात एक विक्रम झालाय. ११ दिवसात ४१ कोटींची कमाई करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी आर्ची आणि परशा यांचा बोलबाला  आहे. आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने सिनेमात काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिच्या यशातून दिसत आहे.

साधी राहणी भावली!

रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु ही सोलापूरमधील अकलूज या गावची मुलगी. तिची साधी राहणी. हाच साधेपणा नागराज मंजुळे यांना भावला. त्यांनी पक्के केले हिलाच घेऊन सिनेमा करायचा. बरोबर एक वर्षानंतर तिला कॉल केला. तिला पुण्यात बोलविण्यात आले. मात्र, अभिनयाचा गंध नव्हता. ग्रामीण भागात राहणारी निरागस मुलगी. मात्र, याच मुलीने कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनयाचा ठस्सा उमटवला.

बिनधास्तपणा आणि आक्रमकपणा

इतर मुलींपेक्षा आर्ची निराळी दिसली. ती गावात राहात असली तरी बेधडक दिसली. ती घोडयावर बसते, बुलेट, ट्रॅक्टर चालवते. उंचावरून विहिरीत सूर मारून पोहते. तिचा बिनधास्तपणा आणि आक्रमकपणा यामागील मेहनत तुम्हाला माहीत नाही. 

कठोर परिश्रम घेतले

नवीत शिकणाऱ्या रिंकूला या सर्व गोष्टी नवख्या होत्या. मात्र, तिने त्या आत्मसात करण्यासाठी जास्त मेहनत घेतली. बुलेट शिकली. घोड्यावर बसणे तिला माहीत नव्हते. तेही तिने आत्मसात केले. ट्रॅक्टर चारविणे तसे अवघड काम, तेही तिने लगेच आत्मसात केले. तसेच विहीर पोहण्याआधी तिला खूप भीती वाटली होती. मात्र, काही करुन उडी मारायची हे धाडस करून तिने ती तशी उडी मारली. त्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले.

रिंकूचा गौरव झाला..

रिंकू राजगुरूने बेधडक, बिनधास्त आक्रमक आर्ची खूपच छान केली आहे. तिच्यात अजिबातच नवखेपणा जाणवला नाही. तिचं दिसणं ही साधंसुधं नॉन ग्लॅमरस आर्चीच्या व्यक्तिरेखेला शोभणारं आहे. मात्र, हे सर्व तिच्याकडून करुन घेतलं नागराज मंजुळे यांनी. या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरू हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.