मुंबई : ईदचा मुहूर्त साधून प्रदर्शित झालेल्या आणि रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या 'बजरंगी भाईजान'बद्दल आता एक नवीन खुलासा झालाय... महत्त्वाचं म्हणजे, हा खुलासा दुसरा - तिसरा कुणी केला नसून या सिनेमाचा अभिनेता सलमान खान यानंच हा भांडाफोड केलाय.
खरं म्हणजे, हा सिनेमा हिरो म्हणून सलमान खान नाही तर आमिर खानला डोळ्यांसमोर ठेऊन लिहिला गेला होता. हा सिनेमा सलमानच्या अगोदर आमिर खानला ऑफर करण्यात आला होता.
परंतु, आमिरला या सिनेमाला आपल्यापेक्षा सलमान अधिक न्याय देऊ शकेल, अशी खात्री होती त्यामुळेच त्यानं स्क्रिप्ट रायटरला सलमानचं नाव सुचवलं... ही गोष्ट स्वत: सलमान खाननं स्पष्ट केलीय.
बजरंगी भाईजानची स्क्रिप्ट बाहुबलीचा दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या वडिलांनी म्हणजेच के व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. प्रसाद यांनी आमिरला डोळ्यांसमोर ठेऊन ही भूमिका लिहिली होती.
'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार, बजरंगी भाईजानच्या यशानंतर एका आयोजित स्पेशल प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमानला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, 'विजयेंद्र अगोदर आमिरकडे गेले होते... तेव्हा विजयेंद्र यांना आमिरनंच माझ्याकडे पाठवलं... यासाठी मी आमिरचा आभारी आहे' असं सलमाननं म्हटलं.
पण, गंमत म्हणजे आमिरनं नकार दिल्यानंतरही हा सिनेमा सरळ सलमानकडे आलाच नव्हता... आमिरनंतर या सिनेमासाठी ऋतिक रोशनलाही या सिनेमासाठी विचारणा करण्यात आली होती. पण, शेवटी हा सिनेमा सलमानच्याच पदरात पडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.