आनंद आणि आदर्श शिंदेच्या बुलंद आवाजाने "सरगम" सजणार ...!

आता तरी देवा मला पावशील का, पाऊले चालती पंढरीची वाट, चंद्रभागेच्या तीरी आणि सत्यनारायणाची कथा… एकाहून एक सरस आणि दर्जेदार गाणी देणारा आपल्या गोड गळ्याने अवघ्या मराठी मनावर चिरंतर राज्य करणारा बुलंद आवाजाचा बेताज बादशाह अर्थात या महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे…

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 6, 2017, 11:22 PM IST
 आनंद आणि आदर्श शिंदेच्या बुलंद आवाजाने "सरगम" सजणार ...! title=

मुंबई : आता तरी देवा मला पावशील का, पाऊले चालती पंढरीची वाट, चंद्रभागेच्या तीरी आणि सत्यनारायणाची कथा… एकाहून एक सरस आणि दर्जेदार गाणी देणारा आपल्या गोड गळ्याने अवघ्या मराठी मनावर चिरंतर राज्य करणारा बुलंद आवाजाचा बेताज बादशाह अर्थात या महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे…

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत मंगळवेढा ते मुंबई हा प्रवास, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराना त्यांच्या महान कार्याला आपल्या गाण्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचविले…

 आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्याचे काम गायकी आणि संगीताच्या माध्यमातून ज्या मोजक्या मातब्बर कलावंताचे नाव येते त्यात प्रल्हाद शिंदे हे नाव अग्रणी म्हणावे लागेल. त्यांनी सुरु केलेली हि संगीतमय परंपरा आणि त्यांचा वारसा त्यांच्या नंतर त्यांची मुले आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी पुढे नेला… त्यांच्या हि आवाजाने एक नवा इतिहास निर्माण केला आणि आज त्यांचा वारसा शिंदेशाही घराण्याचे नवे वारसदार आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे हे तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत… 
 
 शिंदे घराण्याच्या आवाजाने तर जात पात वीसरावी अशीच भुरळ घातली म्हणून तर काय या महाराष्ट्राचे असे कोणतेही सणवार नाहीत ज्या सणाला व पूजेला या शिंदे घराण्याच्या गळ्याची साद नसेल. हाच वारसा झी युवा, "सरगम "या कार्यक्रमाद्वारे एका नव्या रूपात या बुधवारी ८ मार्च आणि गुरुवारी ९ मार्च ला रात्री ९ वाजता महाराष्ट्रासमोर घेऊन येत आहे.
 
"सरगम"हा कार्यक्रम नावाप्रमाणेच अतिशय संगीतमय आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शंकर महादेवन यांच्या दैवी आवाजाने झाली. त्यांना या कार्यक्रमात महेश काळे यांनी साथ दिली. त्याच प्रमाणे या कार्यक्रमात सिद्धार्थ महादेवन, शिवम महादेवन, श्रीनिधी घटाटे ह्यांनीही आपली कला सादर केली. सरगम च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आनंद शिंदे, आदर्श शिंदे हि बाप लेकाची जोडी त्यांच्या बुलंद आवाजाने एक वेगळाच माहोल बनवणार आहेत. 

या एपिसोड मध्ये आनंद शिंदेंचं नवीन पोपट हा, आवाज वाढवं डीजे, चिमणी उडाली भुर अशी तालावर नाचवणारी गाणी आहेतच पण सुन्या सुन्या मैफलीत माझ्या हे अनप्लगड,  तर देवा तुझ्या गाभाऱ्याला अशी मनाला भिडणारी गाणी सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सरगम मध्ये गझल आणि कव्वाली सुद्धा अनुभवयाला मिळेल. कविता निकम या गायिकेने या कार्यक्रमात साथ दिली आहे.
 
सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत ."सरगम" या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत.

 ह्या कार्यक्रमाचे श्रीशंक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल याने संगीतबद्द केले आहे. "सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरूवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.