वर्षभरापूर्वी मिळू शकते पुराची पूर्वकल्पना

पूर, होणारं नुकसान हे सर्व टाळण्यासाठी आगामी काळात आता येणाऱ्या पुराची तब्बल ११ महिने आधी पूर्वसूचना देऊ शकेल, अशी पद्धत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. 

Reuters | Updated: Jul 9, 2014, 12:41 PM IST
वर्षभरापूर्वी मिळू शकते पुराची पूर्वकल्पना title=

वॉशिंग्टन: पूर, होणारं नुकसान हे सर्व टाळण्यासाठी आगामी काळात आता येणाऱ्या पुराची तब्बल ११ महिने आधी पूर्वसूचना देऊ शकेल, अशी पद्धत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. 

नद्यांच्या खोऱ्यांतील गुरुत्वीय क्षेत्रातील सूक्ष्म बदलांच्या उपग्रहानं टिपलेल्या माहितीच्या आधारे ही पूर्वसूचना देणं शक्य होऊ शकेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पुराचा हंगाम येण्याआधी काही महिने नद्यांच्या खोऱ्यांमध्ये किती पाणी साठलेलं होतं, याचं मोजमाप शास्त्रज्ञांनी केलं. 

कॅलिफोर्निया विद्यापीठातील भू-विशेषज्ञ जे. टी. रीगर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झालं आहे. 'एखाद्या बादलीत ठराविक प्रमाणातच पाणी राहू शकते, तेच तत्त्व नदीच्या खोऱ्यालाही लागू होतं', असं रीगर यांचं म्हणणं आहे. २०११मध्ये मिसुरी नदीला मोठा पूर आला होता. त्याआधी किती पाण्यानं जमीन भिजली होती, याचं मोजमाप रीगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपग्रहाच्या माहितीआधारे केलं. त्यांच्या सांख्यिकी मॉडेलनं या मोठ्या पुराची पाच महिने आधी पूर्वसूचना दिली होती.

तशाच प्रकारे पुराची पूर्वसूचना ११ महिने आधीही देता येऊ शकेल; मात्र त्याची विश्वासार्हता तुलनेनं कमी असेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. रीगर यांच्या नव्या पद्धतीमुळं पुराचा अंदाज काही महिने आधी वर्तवणं शक्य होऊ शकणार आहे. 
'त्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी त्याचा उपयोग झाला, तर खूपच चांगलं होईल', असं रीगर यांनी म्हटलंय.

या शास्त्रज्ञांनी 'नासा'च्या ग्रेस या जुळ्या उपग्रहांनी दिलेल्या माहितीचा वापर केला. उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असताना गुरुत्वीय क्षेत्रातील बदलामुळं त्यांच्या कक्षेत काहीशी अस्थिरता निर्माण होते. त्यामुळं पाणी साठणं, बर्फ जमा होणं यांसारखे काही बदल दिसून येतात. त्या माहितीची निरीक्षणं नोंदवून पुराची पूर्वसूचना देता येऊ शकेल, असं रीगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.