लंडन : सरकारी बँकांचे नऊ हजार रुपये बुडवणाऱ्या विजय माल्ल्याची लंडनमध्ये अय्याशी सुरु आहे. लंडनमधल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला माल्ल्यानं हजेरी लावली. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे लंडनमधील राजदूत उपस्थित होते, पण उपस्थितांमध्ये माल्ल्या दिसताच राजदूत कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेले.
सुहेल सेठ यांचं 'मंत्राज फॉर सक्सेसः इंडियाज ग्रेटेस्ट सीईओज टेल यू हाउ टू विन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला माल्ल्यानं हजेरी लावली होती. दरम्यान निमंत्रण पाठवलेल्या यादीमध्ये माल्ल्याचे नाव नव्हते असा दावा परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे.
पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम जाहीर होता. या कार्यक्रमाची जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे कोणीही या कार्यक्रमाला येऊ शकत होतं, कोणालाही आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया सुहेल सेठ यांनी दिली आहे.