नवी दिल्ली : भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय.
भारतात बोलावून घ्या, अशी याचना करणाऱ्या या महिलेचं नाव गुरप्रीत कौर आहे. ती हरियाणातल्या फरीदाबादमध्ये राहणारी आहे. सासरच्या लोकांनी फसवणूक करुन जर्मनीमध्ये अडकवून ठेवल्याचं तिचं म्हणणं आहे.
गुरप्रीत आणि तिची सात वर्षांची मुलगी जर्मनीमधल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये अडकल्याचा दावा ती करतेय. झी न्यूजच्या एका प्रेक्षकानं फेसबुकच्या माध्यमातून आलेला हा व्हिडीओ पाठवलाय. गुरप्रीतचं लग्न मनोजशी २००५ मध्ये झालं होतं. पण २०१० मध्ये मनोज अचानक गायब झाला, तो आजपर्यंत सापडलेला नाही. म्हणून गुरप्रीतनं सासरच्या लोकांविरोधात तक्रार केली. तुझा पती जर्मनीत आहे, असं सांगत मनोजच्या नातेवाईकांनी तिला सप्टेंबर २०१५ मध्ये जर्मनीत पाठवलं. तेव्हापासून ती तिथे अडकून पडलीय.
गुरप्रीतनं कुणाचा तरी फोन घेऊन त्यामध्ये हा व्हीडिओ शूट केलाय आणि तो यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आलाय. आता भारत सरकारनंही गुरप्रीतला मदतीचं आश्वासन दिलंय. त्यामुळे लवकरच गुरप्रीतची जर्मनीतून सुटका होण्याची आशा आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तातडीनं हस्तक्षेप करत गुरप्रीतला मदत पुरवण्याची व्यवस्था केलीय. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता गुरप्रीत आणि तिची मुलगी भारतात दाखल होणार आहेत.
Gurpreet and her daughter will reach New Delhi from Frankfurt by flight AI 120 at 9.35 am tommw morning. https://t.co/MUGRa2twS0
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) February 3, 2016