इस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी पोलिसांनी कापल्या १३,००० पुरुषांच्या दाढ्या

दुशान्बे : मध्य आशियातील ताजिकीस्तान हा इस्लामबहुल देश सध्या इतर जगाप्रमाणेच दहशतवादाशी सामना करतोय.

Updated: Jan 21, 2016, 06:20 PM IST
इस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी पोलिसांनी कापल्या १३,००० पुरुषांच्या दाढ्या title=

दुशान्बे : मध्य आशियातील ताजिकीस्तान हा इस्लामबहुल देश सध्या इतर जगाप्रमाणेच दहशतवादाशी सामना करतोय. आता इस्लामी दहशतवादावर मात करण्यासाठी तेथील सरकारने काही कठोर उपाय करण्याचा निर्णय घेतलाय.

शेजारच्या इस्लामी राष्ट्रांतील इस्लामी कट्टरतावादाचा प्रभाव रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा भाग म्हणून तेथील पोलिसांनी तब्बल १३,००० पुरुषांच्या दाढी कापून टाकल्या.

इतकंच काय, तर देशात इस्लामी वस्तू विकणाऱ्या १,७०० दुकानांनाही टाळे लावले गेले आहे. महिला आणि तरूण मुलींनाही सरकारने इस्लामी पद्धतीचा स्कार्फ बांधायला बंदी घातली आहे.

देशातील 'परदेशी प्रभाव' कमी करण्यासाठी आणि देशात 'सेक्युलॅरिजम' टिकवून ठेवण्यासाठी तेथील सरकार काही वर्षे प्रयत्नशील आहे. गेल्याच वर्षी नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांना अरबी पद्धतीची नावेही न ठेवण्याचा कायदा संसदेने मंजूर केला होता. एका इस्लामवादी राजकीय पक्षावरही देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी बंदी घातली होती.

आता या बातमीने मात्र सर्वांनाच धक्का बसलाय. पण काही ताजिक तरूण आयसीस मध्ये दाखल झाल्याने आता गंभीरपणे काही कठोर उपाय करण्याची गरज असल्याचे ताजिकीस्तान सरकारचे म्हणणे आहे.