पेशावर : पेशावरच्या बाचा खान विद्यापीठावर झालेला हल्ल्यामागे मनोहर पर्रिकरांचा हात आहे, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी उधळलेयत. मुख्य म्हणजे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील तहरिक ए तालिबान या संघटनेनं याआधीच घेतली आहे.
भारताची सहनशक्ती आता संपली आहे, आपल्याला वेदना देणा-या शत्रूला जशास तसं उत्तर द्यायला हवं, असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी केलं होतं. या वक्तव्याचा दाखला देत रेहमान मलिक यांनी हे वक्तव्य केलं.
तसंच या हल्ल्यात भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ चा हात असल्याचा 'जावईशोध'ही मलिक यांनी लावलाय. रॉ नं तहरिक ए तालिबान या संघटनेशी हातमिळवणी केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलिक यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी पठाणकोट हल्ल्यावरही भाष्य केलंय. भारतातली लोकच भारतामध्ये पठाणकोटसारखे हल्ले करत असतात.
मोदींनी पाकिस्तानशी चर्चेला सुरुवात केली, पण रॉ ला चर्चा नकोय, त्यामुळे त्यांनी पठाणकोट हल्ला घडवून आणल्याचा आरोप रहमान मलिक यांनी केलाय.