लियोबोन (ऑस्ट्रिया) : जगात कोणाला तुरुंगात जायला आवडेल का? या प्रश्नाचं उत्तर साहजिकच नाही असं असेल. तुरुंग म्हणजे अंधार कोठडी, दुर्गंधी, खराब जेवण अशा अनेक गोष्टींचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण, एखादं तुरुंग पंचतारांकित हॉटेलसारखं असं कोणी तुम्हाला सांगितलं तर?
तुमचा विश्वास बसणार नाही, पण, युरोपातील ऑस्ट्रिया देशात एक असं कारागृह आहे ज्याची तुलना केवळ एखाद्या पंचतारांकित हॉटेलशी केली जाऊ शकते. तशाच सुविधा इथे ठेवल्या गेलेल्या कैद्यांना मिळतात. 'जस्टिस सेंटर लियोबेन' नावाचं हे कारागृह गेल्या ११ वर्षांपासून इथे दिल्या जाणाऱ्या सोयींसाठी प्रसिद्ध आहे.
हे कारागृह ऑस्ट्रियातील लियोबेन शहरात आहे. हे शहर पहाडी शहर असून त्याचं सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालतं. जोसेफ होहेंसिन्न नावाच्या एका सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन वास्तुविशारदाने या कारागृहाची निर्मिती केली आहे.
या कारागृहात २०० पेक्षा जास्त कैद्यांच्या राहाण्याची सोय केली जाऊ शकते. इतकंच काय तर या कारागृहात अत्याधुनिक जिम, स्पा आणि अनेक प्रकारची खेळ खेळण्याची व्यवस्थाही केली गेली आहे.
एकाच वेळेस एका ठिकाणी १३ कैद्यांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाते. आपापली खोली ते एकमेकांसोबत शेअर करण्याचीही त्यांना मुभा दिली जाते. इथल्या प्रत्येक कैद्याच्या खोलीत एक बाथरुम, एक स्वयंपाक घर आणि एका बेडरुमसोबतच एक लिव्हिंग रुम आहे. तसंच या लिव्हिंग रुममध्ये प्रत्येकी एक टेलिव्हिजनही आहे.
आता इतकं आलिशान कारागृह आहे म्हटल्यावर कोणाला या कारागृहात काही दिवस घालवावे असं वाटलं नाही तरंच नवल.