काबूल : दक्षिण पूर्व अफगाणिस्तानात एका क्रिकेट मॅचवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजतंय. या हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झालाय तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत.
'एफे' या समाचार एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी २७ दर्शकांचं अपहरण केलंय. यामध्ये, अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
गुरुवारी दुपारी पकटिया प्रांतातील जुरमत जिल्ह्यात एका खेळाच्या मैदानावर क्रिकेट मॅच सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
या हल्ल्यात एका ऑफ ड्युटी पोलीस अधिकाऱ्यासोबत दोन खेळाडुंचाही मृत्यू झालाय. बंधक बनवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये २४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या मुलांच्या शोधार्थ रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. पण, अंधारामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं. शुक्रवारी सकाळापासून ही शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आलं. सुरक्षा दलांनी डोंगराळ भागात लपलेल्या हल्लेखोरांना घेरलंय त्यामुळे ते इथून पळून जाऊ शकणार नाहीत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला तालिबाननं घडवून आणलाय. पण, या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्यापपर्यंत स्वीकारलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.