वाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

PTI | Updated: Nov 3, 2014, 06:59 AM IST
वाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी   title=

वाघा सरहद्द (पाकिस्तान) : पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी अल-कईदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या जनदऊल्लाह या संघटनेनं स्वीकारली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक सुखेरा यांनी सांगितलं की, दररोज नेहमीप्रमाणे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक गर्दी करतात. रविवारी हा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोर एका प्रवेशद्वाराजवळ पोहोचला आणि त्यानं स्फोट करून स्वत:ला उडविलं. मृतांमध्ये तीन पाकिस्तानी रेंजसचा समावेश आहे. मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी रेंजर्सनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. परंतु, आत्मघाती बॉम्बर शोधणे कठीण असतं, असं सुखेरा यांनी सांगितलं.

आधीच्या वृत्तात हा सिलिंडरचा स्फोट असावा, असं सांगण्यात आलं होतं. आमच्या पथकांनी हा आत्मघाती स्फोट असल्याचं सांगितलं. या स्फोटासाठी ५ किलो स्फोटकं वापरण्यात आली. हल्लेखोर परेड मैदानाच्या दरवाजाजवळ थांबला. लोक या दरवाजाजवळ जमल्यानंतर त्यानं स्फोट केला. पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या वाघा सीमेवरील चौकीनजीकच्या रेस्टॉरन्टच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी बॉलबेअरिंग्ज सापडल्याचं अन्य एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व २०० जखमींना लाहोरमधील विविध इस्पितळात हलविण्यात आल्याचे घुरकी इस्पितळच्या एका वरिष्ठ डॉक्टरनं सांगितलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.