जिनिव्हा: पश्चिम आफ्रिकेत प्राणघातक विषाणू इबोलाच्या संक्रमणानं सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असलेल्या सियेरा लिओननं यास अटकाव करण्यासाठी चार दिवस बंद पाळण्याची घोषणा केली आहे. येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान लोकांनी घर सोडून बाहेर जाण्यास बंदी राहील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
इबोला साथीला आळा घालण्याच्या उद्देशानं सरकारनं देश बंदचं आवाहन केलं आहे. या विषाणूच्या अचानक झालेल्या प्रकोपानं पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये आतापर्यंत 2000हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांत सियेरा लिओन, लायबेरिया, गिनी आणि नायजेरिया या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच नोव्हेंबरपासून इबोला संक्रमणास अटकाव करणाऱ्या लसीचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केला जाईल, अशी घोषणा शुक्रवारी केली.
मार्चमध्ये इबोलाच्या साथीला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत सियेरा लिओनमध्ये जवळपास 491 हून अधिक डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, इबोला साथ रोखण्यासाठी गेल्या महिन्यात लायबेरियाची राजधानी मॉनरोवियाच्या झोपडपट्टय़ाही आठवडाभराहून अधिक काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.